संत सेवेतून मिळणारी सकारात्मक ऊर्जा

164

<<स्वाती विप्रदास>>

श्री सद्गुरू शंकर महाराज यांचा ७१ वा समाधी सोहळा आजपासून २३  एप्रिलपर्यंत पुण्यातील धनकवडी येथील मठात साजरा होत आहे.  या सात दिवसांत  त्रिकाळ आरती , लघुरुद्र , महारुद्र , भजन , कीर्तन , प्रवचन व सायंकाळी नामवंत गायकांच्या गायनाचा कार्यक्रम अशी ही आनंदपर्वणी साधकांसाठी असते.   या भक्तिरसात प्रत्येकाला आनंदाचा अनुभव येतो. मनाला शांतता लाभते. विनाकारण विविध विचारांनी थकलेल्या मनाला या सात दिवसांत आध्यात्मिक ऊर्जा मिळते.  सप्ताहाच्या काळात मठात  दररोज होणाऱ्या अन्नदानाने भाविक तृप्त होतो.

 समर्थानी ग्रंथराज दासबोधात भक्तिनिरूपम या समासात भक्तीचे महत्त्व पटवून दिले आहे. समर्थ म्हणतात, ‘नाना सुकृताचे फळातो हा नर देह केवळ त्यामध्ये भाग्य सफळा तरीच सन्मार्ग लागे’ खूप पुण्य असेल तेव्हा नरदेह लाभतो आणि त्यातही आपले भाग्य उत्तम असेल तरच सन्मार्ग लाभतो. संतसेवा ही आपल्या हातून होते. संताचा सहवास लाभतो.

संतसहवास खूप काही सामर्थ्य देतो, धैर्य देतो. आयुष्य बळकटपणे जगण्याचे कौशल्य देतो.  तीर्थाटन करणे, नामस्मरण करणे यासारखा दुसरा आनंद तो काय. या विविध साधनांनी जन्माला आल्याचे सार्थक होते. काही अन्नदान करावे , नामस्मरण करावे, विविध भक्तिरसाचे श्रवण करावे. आत्म्याला शांती मिळावी म्हणून या मार्गाचा अवलंब करावा असे सर्व संतांनी आवर्जून सांगितले आहे. आपले चित्त, आपले मन या सर्वेत्तमाकडे लावल्याने मनाला प्रचंड शक्ती प्राप्त होते. सद्गुरूच्या सप्ताह सोहळय़ात नवविद्या भक्तीचा लाभ प्रत्येकाला मिळत असतो.

नाही भक्ती नाही प्रेम। नाही निष्ठा नाही नेम। नाही देव नाही धर्म।                                                 

 श्री राम जर मनुष्य जन्माला येऊन वरील ओळीतील अर्थ समजला नाही तर आपले जीवन प्रेतवत होते. चैतन्याचा अनुभव येत नाही. निष्ठूरता, स्वार्थ, नैराश्य या सर्व गोष्टींना उधाण येते. त्याउलट सत्संग हा मार्ग अवलंबला तर मनःशांती, समाधान, प्रचीती या गोष्टींना उधाण येते.  हा अनुभव प्रत्येक साधकाचा आहे.  जो संताचरणी लीन होते त्याला त्याची चिंता, भय, नैराश्य हे काहीही त्रास देत नाहीत. अशी श्रेष्ठ आहे. अनेक साधकांना विचारले असता ते म्हणतात आम्हाला काही समजले नाही. पण एकच समजले सद्गुरूंच्या चरणाला स्पर्श केल्याने जे आमचे आयुष्यात चांगले बदल घडलेत. ते सर्व श्रेय सद्गुरू शंकर महाराजांनाच आहे. आपण अतिशय सामान्य असतो. प्रपंचातील अटाअटींना तोंड देता देता नाकीनऊ येतात. हा भवसागराचा प्रवास संतसेवेमुळेच आम्हाला सोपा वाटतो. संतसहवासात मिळणारे धार्मिक विचार जगण्याला सामर्थ्य देतात. आपल्याकडे सकारात्मक ऊर्जा येत राहते, विचार सुधारतात. बघता बघता या उत्सावाचे सात दिवस भराभर संपतात व शेवटी काल्याचे कीर्तन होते व कार्यक्रमाची सांगता होते. संतसेवा हे मेडिसिन मनासाठी उत्तम आहे. मनाची गाडी आत्म्याला चालवावी लागते. त्या मनाला अध्यात्म नावाचे पेट्रोल भरत राहावे लागते. तर ती गाडी न गंजता पुढे चालू शकते.

आपली प्रतिक्रिया द्या