स्वीडीश लोकांना ‘बेड’ लागलंय! रतीक्रीडेला ‘स्पोर्टस्’ म्हणून मान्यता, 8 जूनपासून स्पर्धेचेही आयोजन

या जगात कधीही, कुठेही काहीही म्हणजे काहीही घडू शकते. म्हणजे बघा, हिंदुस्थानसह जगातील अनेक देशांमध्ये आजही ‘सेक्स’ या विषयावर उघड बोलणे टाळले जाते. चर्चा तर सोडाच, पण साधा ‘सेक्स’ हा शब्द उच्चारला तरी डोळे आणि कान टवकारले जातात. अशा स्थितीत स्वीडन या देशाने मात्र कमालच केली आहे. तेथे चक्क ‘रतीक्रीडे’ची स्पर्धा होणार असून 8 जूनपासून ती सुरू होईल.

‘स्वीडन सेक्स फेडरेशन’ या सरकारमान्य संघटनेने चक्क पहिली युरोपियन सेक्स चॅम्पियनशिप आयोजित केली आहे. ही स्पर्धा अनेक आठवडे सुरू राहणार असून स्पर्धक जोडप्याला 45 मिनिटे ते एक तासाचा अवधी दिला जाईल. त्यात त्यांनी आपल्या रतीक्रीडेची कला ‘दाखवायची’ आहे.

स्वीडन सरकारचे हे धाडसी पाऊलच म्हणायला हवे. कारण त्यांनी ‘रतीक्रीडे’ला थेट खेळाचा दर्जा दिला आहे. युरोपातील काही देशांमधील 20 स्पर्धक जोडप्यांनी आतापर्यंत नावनोंदणी केली असून तीन परीक्षक आणि प्रेक्षक पसंती यावर विजेते जोडपे जाहीर करण्यात येणार आहे.

गुणउधळा, गुण मिळवा

या स्पर्धेचे नियमही तसे गमतीशीर आहेत बरं. प्रत्येक जोडप्याचे 16 प्रकारांत परीक्षण करण्यात येईल आणि त्यांना 5 ते 10 पर्यंतचे गुण देण्यात येतील. रतीक्रीडेत शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक संतुलन या दोहोंची गरज असते. त्यामुळे हा ‘खेळ’ आहे आणि हा खेळ अवघ्या युरोपात खुलेआम खेळला जाईल, असे फेडरेशनचे अध्यक्ष डॅगन ब्राटीच यांनी सांगितले.