दसऱ्यानिमित्त खास: हे पदार्थ चाखलेत का?

मीना आंबेरकर

दसऱयानिमित्त…

दसरा… साडेतीन मुहूर्तापैकी एक सण. आश्विन शुद्ध दशमी या दिवशी साजरा केल्या जाणाऱया या सणाला विजयादशमी असेही म्हटले जाते. सण म्हटला की मराठी माणूस स्वतः गोडधोड खातो, दुसऱयालाही खाऊ घालतो. त्यामुळे यावेळी दसऱयाच्या मुहूर्तावर वेगवेगळ्या राज्यांतील चविष्ट खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेऊया.

आपल्या देशातील विविध प्रांतांमुळे आपल्या देशातील खाद्य संस्कृतीत खूप वैविध्य आहे. त्यातले खाद्य घटक जरी सारखे असले तरी खाद्यपदार्थ बनविण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. याचा आपल्याला प्रत्यय येतो किंवा ज्या प्रांतात जो घटक पदार्थ जास्त प्रमाणात पिकतो त्याचा वापर खाद्यपदार्थांमध्ये जास्त केला जातो. उदा. कोकणात तांदूळ व नारळ हे मुख्य पीक आहे. त्यामुळे तेथील खाद्यपदार्थांत त्याचा वापर जास्त असतो.

noodles-pudding

शेवयांचे पुडिंग

साहित्य... २ वाटय़ा शेवयांचा चुरा. दीड वाटी साखर, अर्धी वाटी साजूक तूप, चारोळय़ा, बेदाणे, वेलची पूड, जायफळ पूड, आवडत असल्यास आवडीचा इसेन्स, १ कप दूध.

कृती..पातेल्यात तूप घालून मंद आचेवर शेवया तांबूस रंगावर परतून घ्याव्यात. त्यात दीड वाटी गरम पाणी, कपभर दूध घालावे. शेवया शिजल्यावर त्यात साखर, चारोळय़ा, बेदाणे, सोललेल्या बदामाचे काप, वेलची पूड, जायफळ पूड घालून झाकून ठेवावे. नंतर परत एक दणकून वाफ काढून खाली उतरवावे. १०/१५ मिनिटांनी ते घट्ट होईल, कोरडे वाटल्यास चमचाभर तूप सोडावे. दुधाबरोबर थोडी घोटलेली साय घातल्यास छान लागते.

parwal-sweetdish

भरला परवर

साहित्य …परवर अर्धा किलो, खसखस भाजून, १ मोठा चमचा ओलं खोबरं, कोथिंबीर अर्धी वाटी, लसूण बारीक चिरून, किसलेलं आलं, १ चमचा हिरवी मिरची आवडीप्रमाणे बारीक चिरून, बारीक चिरलेला कांदा १ वाटी, भिजवलेले काजू १०-१२-, बेदाणे – १ मोठा चमचा गरम मसाला, १ चमचा साखर, लिंबूरस, मीठ, तूप, अर्धी वाटी खवा.

कृती..परवर धुऊन तासून मध्ये चिरून घ्यावेत. बिया काढून मीठ लावून ठेवावेत. कांदा तुपावर परतून घ्यावा. त्यात आले, लसूण, मिरच्या घालून परतावे. खमंग वास आल्यावर त्यात खोबरं, कोथिंबीर घालून परतावे. खसखस, मीठ, लिंबूरस, गरम मसाला, काजू, बेदाणे घालून पुन्हा परतावेत नंतर खवा घालून हे मिश्रण नीट एकजीव करावे व परवरात भरावे. जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालून हे परवर मंदाग्नीवर पाण्याचा शिपका देऊन वाफवून घ्यावेत.

harbara-poli

हरभरा डाळीची पोळी

साहित्य ..अर्धी वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी ओला नारळ, २-३ हिरव्या मिरच्या, आले कीस – १ चमचा, ५-६ चमचे तेल, थोडी हिंग, मोहरी, पोळीकरता २ वाटय़ा कणिक, धणा-जिरा पावडर, १ चमचा मीठ, चवीप्रमाणे तेल, तांदूळ पीठ लावण्यासाठी.

कृती ..हरभरा डाळ दोन तास भिजवावी. मीठ, आले, हिरव्या मिरच्या हे सर्व मिक्सरमधून काढावे. डाळ वाटताना फार पाणी घालू नये. डाळ जाडसर खाळ ठेवावी. हे सर्व वाटण कुकरमध्ये शिटी काढून उकडून घ्यावे. हिंग-मोहरीची फोडणी करून त्यात डाळ चांगली परतावी. परतताना खोबरेही घालावे. सारण तयार झाल्यावर भिजवलेल्या कणकेचे मध्यम गोळे करून पुरण भरतो. त्याप्रमाणे उंडे करून तांदळाच्या पिठीवर पोळी वाटावी. थोडय़ा तेलावर पोळी खरपूस भाजावी. गरम गरम सर्व्ह करावी. बरोबर गोड दही-चटणी द्यावी.

malpua

मालपुवा

साहित्य …अर्धा किलो खवा, ६ मोठे चमचे मैदा, ४ कप दूध, १०/१२ बेदाणे. पाव चमचा केशर, ४ वाटय़ा साखर, अर्धा चमचा वेलची पावडर, चांदीचा वर्ख, तळण्यासाठी तूप.

कृती...अर्धा कप दुधात बेदाणे भिजत घाला. केशर खलून दुधात घाला. खवा हाताने मळून घ्या त्यात बेदाणे, वेलचीपूड घाला. मिश्रण १ तासभर झाकून ठेवा, साखरेचा एकतारीपेक्षा कमी पाक करून घ्या. जाड बुडाच्या फ्राइंग पॅनमध्ये तूप घाला. तूप तापले की पळीने मिश्रण तुपात ओतून लहान लहान धिरडी करून घ्या. झाऱयाने त्यांच्यावर तूप सोडत रहावे. दोन्ही बाजूंनी लालसर करून घ्यावे. तूप निथळून चिमटय़ाने उचलून पाकात टाकावे. मिनिटभराने पाकातून काढून ठेवावेत. वरून चांदीचा वर्ख लावावा.

आपली प्रतिक्रिया द्या