जीवनशैली

4

संग्राम चौगुल,[email protected]

पोहणे सर्वांगसुंदर व्यायाम

पोहण्याचे बरेच आरोग्यदायी फायदे आहेत. अगदी गुडघेदुखी, सांधेदुखी अशा बऱयाच विकारांवरही पोहणे हा रामबाण उपाय आहे.

आवडता खेळ कोणता असं कुणी विचारलं तर ‘पोहणे’ असं आपण मोठय़ा आनंदाने आणि उत्साहाने सांगतो. पण पोहणे हा नुसता खेळ नाही तर तो एक सर्वोत्कृष्ट कार्डिओ एक्सरसाइजही आहे याची कुणाला फारशी कल्पना नसते. पण या खेळामुळे खूप जास्त कॅलरीज बर्न होत असल्याने त्यामुळे शरीराच्या फिटनेससाठी त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. पण अर्थातच यासाठी इतर खेळांप्रमाणेच भरपूर स्टॅमिना असावा लागतो. पोहण्यासाठी आपल्या शरीराच्या सर्व स्नायूंचा पुरेपूर वापर होत असतो. त्यामुळे हे स्नायू बळकट असणं खूप गरजेचं आहे. केवळ स्नायूच नाही तर त्याबरोबरच हृदय आणि यकृताचेही पोहण्यामध्ये खूप महत्त्व आहे. भरपूर पोहल्यामुळे माणसाच्या शरीरातील जॉइंटस् म्हणजे सांध्यांचीही क्षमता वाढते. एकूणच बघितलं तर स्वीमिंग हा खूप चांगला व्यायाम प्रकार म्हणता येऊ शकेल.

खेळांमध्येच पोहण्याचा समावेश केला जातो; पण खेळ म्हणून नव्हे तर सर्वसामान्य लोकांनी एक व्यायाम म्हणून पोहण्याकडे पाहिले पाहिजे. कारण व्यायामाच्या दृष्टीने पोहणे खूप फायद्याचे आहे. शरीर पूर्णपणे तंदुरुस्त ठेवायचे असेल, स्नायू बळकट करायचे असतील तर पोहण्याचा व्यायाम केलाच पाहिजे. हे आजकाल बहुतांश आईवडिलांना पटू लागल्यामुळेच आपल्या मुलाला अभ्यासाबरोबरच ते पोहण्याच्या क्लासलाही पाठवतात. त्याने पोहण्यामध्ये तरबेज व्हावे, या खेळात त्याने प्रगती करावी यापेक्षा त्याचा चांगला व्यायाम व्हावा हाही काही चाणाक्ष पालकांचा उद्देश असतो.

या क्रीडा प्रकारात सर्वात जास्त उष्मांक खर्च होत असल्यामुळे अशा खेळाडू मुलांच्या आहाराकडेही पालकांनी नीट लक्ष द्यायला हवे. त्यांना हाय कॅलरीज फूड दिले पाहिजे. ऑलिंपिक जलतरणपटू ज्या पद्धतीचा आहार घेतात तो पाहिला तर आश्चर्य वाटेल. कारण त्यांचा आहार एखाद्या सर्वसामान्य बॉडीबिल्डरपेक्षाही जास्त असू शकतो. साधारणतः जलतरणपटू दररोज किमान  सहा ते सात हजार कॅलरीजचे इनटेक करतात. एवढे खाऊनही त्यांचा फिटनेस शेपमध्ये आणि चांगला असतो.

खेळ म्हणूनही योग्य

मुलांनी जिमला जाणे, रेस्टलिंगचा सराव करणे किंवा इतर खेळांमध्ये रस घेणे पालकांना आवडत नाही. पण पोहायला शिकण्यासाठी हेच पालक आपल्या मुलांना जबरदस्तीने पाठवतात. केवळ व्यायाम म्हणूनच नाही तर पोहणे हा एक चांगला खेळ म्हणूनही काही पालक त्याकडे पालक गंभीरपणे बघू लागले आहेत. कारण हा खेळ ऑलिंपिक क्रीडास्पर्धेत फेवरीट गेम आहे. आता या खेळाकडे कॅरीयर म्हणून बघितले जातेय. साधारपणपणे पोहणे शिकायचे तर मुलांना लहान वयातच पाठवणे चांगले असते. कारण लहानपणापासूनच मुलांना पोहण्याची सवय असेल तर त्यांचा फिटनेस चांगला राहून ते जास्तीतजास्त वेळ पोहू शकतात.