सावधान ! स्वाईन फ्लू परत आलाय

25
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । पुणे

राज्यात काही वर्षांपूर्वी थैमान घातलेल्या स्वाईन फ्लू रोगानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. स्वाईन फ्लूच्या आगमनामुळे राज्यातील आरोग्य विभाग खडबडून जागं झालं आहे. राज्यभरात स्वाईन फ्लूनं पाय पसरायला सुरुवात केली आहे. पुणे आणि नाशिकमध्ये आतापर्यंत ३० पेक्षा जास्त लोकांनी जीव गमावला आहे. तर अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. स्वाईन फ्लूची वाढती दहशत लक्षात घेता प्रशासनानं आरोग्य विभागाला सतर्क राहण्यास सांगितलं आहे.

वातावरणात सतत होणारे बदल स्वाईन फ्लूच्या वाढीस कारणीभूत ठरत आहेत. राज्यभरात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे खडबडून जागं झालेल्या प्रशासनानं आरोग्य विभागास सतर्क राहण्याचा आदेश दिला आहे. तसंच नागरिकांनी स्वच्छता राखावी आणि आरोग्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावं असंही सांगण्यात आलं आहे.

आरोग्य विभागानं सांगितलं की, थंडी-तापाकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. सतत थंडी वाजणं, एकसारखा ताप असणं, खोकला, सर्दी, घसा दुखणं किंवा खवखवणं, अंगदुखी, पोटदुखी ही सगळी स्वाईन फ्लूची लक्षणं आहेत. अशी लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरकडे जाऊन तपासणी करावी असं आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या