चॅम्पियन फेडरर! नदालला हरवत जिंकली मियामी ओपन टेनिस स्पर्धा

15

सामना ऑनलाईन, मियामी

सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर टेनिस कोर्टवर उतरणाऱ्या ३५ वर्षीय रॉजर फेडरर या टेनिस सम्राटाने रविवारी मध्यरात्री झालेल्या मियामी ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुषांच्या एकेरीत स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालला पराभूत करीत चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला. स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने राफेल नदालवर ६-३, ६-४ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करीत या वर्षातील ऑस्ट्रेलियन, इंडियन वेल्सनंतरचे तिसरे जेतेपद पटकावले.

चौथ्या स्थानावर मुसंडी
रॉजर फेडररने या वर्षी तीन स्पर्धा जिंकल्यामुळे त्याला एटीपी रँकिंगमध्ये चौथ्या स्थानावर मुसंडी मारता आली आहे. ग्रेटब्रिटनचा ऍण्डी मरे पहिल्या स्थानावर विराजमान असून सर्बीयाचा नोवाक जोकोविच दुसऱ्या स्थानावर आहे. स्वित्झर्लंडचा स्टॅन वावरिंका तिसऱ्या स्थानावर असून रॉजर फेडरर चौथ्या स्थानावर आहे. राफेल नदालच्या रँकिंगमध्येही सुधारणा झाली आहे. तो पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. केई निशीकोरीची सातव्या स्थानावर घसरण झालीय.

आता लक्ष फ्रेंच ओपनवर
या वर्षी आतापर्यंत तीन स्पर्धा जिंकत टेनिस कोर्टवर झोकात पुनरागमन करणाऱ्या रॉजर फेडररने आता पुढील दोन महिने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता तो थेट फ्रेंच ओपनमध्ये आपला जलवा दाखवेल. त्याआधी क्ले कोर्ट म्हणजेच लाल मातीवर होणाऱ्या कोणत्याही स्पर्धांमध्ये तो खेळणार नाही.

सानिया-बार्बोराला उपविजेतेपद
सानिया मिर्झा व बार्बोरा स्ट्रायकोव्हा या जोडीला मियामी ओपन टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. ग्रॅब्रियला डॅबरोवस्की व शु इफान या जोडीकडून त्यांना ४-६, ३-६ अशा फरकाने जेतेपदाच्या लढतीत हार सहन करावी लागली. त्यामुळे सानिया मिर्झा व बार्बोरा स्ट्रायकोव्हा जोडीला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले.

माझ्या वाढत्या वयानुसार प्रत्येक स्पर्धांमध्ये सहभागी होणे शक्य नाही. माझ्या शरीराला आराम मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मी जर फिट नसेन किंवा मला खेळाचा आनंद घेता येणार नसेल तर राफेल नदालसारख्या अव्वल खेळाडूचा सामना करूच शकत नाही. स्पर्धेआधी जय्यत तयारी करणेही तेवढीच महत्त्वाची आहे. – रॉजर फेडरर

आपली प्रतिक्रिया द्या