या देशात आहेत सोन्याची गटारं

37

सामना ऑनलाईन । बर्न

गटार म्हटलं की साधारणतः डोळ्यासमोर काय येतं? घाणेरडं पाणी, कचरा आणि दुर्गंधी.. प्रत्यक्ष तर सोडाच पण गटाराची आठवणसुद्धा किळस आणते. पण, या जगात असाही एक देश आहे जिथली गटारंही सोन्याची आहेत. स्वित्झर्लंडमधील शास्त्रज्ञांनी गटारांमधून सुमारे ४३ किलो सोनं आणि तीन टन चांदी मिळवली आहे.

गटारांमधून सोन मिळवण्याच्या घटनेचा खुलासा स्विस फेडरल ऑफिस फॉर एनव्हॉयरमेंटने केलेल्या एका सर्वेक्षणातून झाला आहे. या सर्वेक्षणात देशभरातल्या ६४ सांडपाणी वाहून नेणाऱ्या प्रकल्पांची पाहणी करण्यात आली. यातील बहुतेक प्रकल्प हे स्वित्झर्लंडच्या दक्षिण भागात आहेत आणि हा भाग सोन्याच्या खाणींचा भाग म्हणून ओळखला जातो. या प्रकल्पांमधून सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारांमध्ये खूप जास्त प्रमाणात सोनं आढळून आलं आहे.

याखेरीज ज्या उत्पादनांमध्ये चांदी वापरली जाते, तिथल्या गटारांमध्ये चांदी सापडली आहे. त्यामुळे सर्वेक्षण करणाऱ्या शास्त्रज्ञांनी दरवर्षी किमान तीन टन चांदी या गटारांमधून वाहून जात असावी, असा निष्कर्ष काढला आहे. स्वित्झर्लंडमध्ये सोन्या-चांदी व्यतिरिक्त या गटारांमधून अनेक प्रकारचा किमती ऐवज आणि रोख रक्कमही मिळाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या