जम्मू कश्मीरमध्ये बंदीच्या काळातही गिलानीचे इंटरनेट सुरू; दोन बीएसएनएल अधिकाऱ्यांची चौकशी

जम्मू कश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर तेथे कलम 144 लागू करण्यात आले होते. या बंदीच्या काळातही फुटीरतावादी नेता सय्यद अली शाह गिलानी याची इंटरनेट सेवा सुरू होती. या काळात त्याने ट्विट केल्याचे उघड झाले आहे. बंदीच्या काळात जम्मू कश्मीरमध्ये दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा बंद होत्या. तरीही गिलानी याचे इंटरनेट कसे सुरू होते, याबाबत बीएसएनएलच्या दोन अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे.

जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर सुरक्षेसाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कश्मीर खोऱ्यात दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा 4 ऑगस्टपासून बंद करण्यात आली होती. मात्र, बंदीनंतरही आठ दिवस गिलानीकडे फोन आणि इंटरनेट सेवा सुरू होती. गिलानीने या काळात दूरध्वनी आणि इंटरनेटचा वापर केला का याची चौकशी करण्यात येत आहे. गिलानीने या काळात ट्विटरचा वापर केल्याचे उघड झाले आहे. बंदीच्या काळातही गिलानी यांनी स्वतःसाठी इंटरनेट सेवा कशी सुरू ठेवली होती, याचीही चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी बीएसएनएलच्या दोन अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. गिलानीचे इंटरनेट सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने त्याचे इंटरनेट बंद करण्यात आले होते.गिलानी नेहमी त्याच्या ट्विटर अंकाऊटवरून हिंदुस्थानविरोधी पोस्ट करत असतो. त्याच्या पोस्टचा निषेध करत अनेक युजर्सने गिलानीला पाकिस्तानात पाठवण्याची मागणी केली आहे. गेल्या महिन्यात गिलानी याचा प्रवक्ता गुलजार अहमद गुलजारलाही सुरक्षा अधिनियातंर्गत अटक करण्यात आली होती.

जम्मू कश्मीरमधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सोमवारपासून सर्व शाळा सुरू करण्यात आल्या असून कलम 144 मध्ये सूट देण्यात आली आहे. कश्मीर खोऱ्यासह श्रीनगरमध्येही टप्प्याटप्प्याने सर्व निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. सर्व निर्बंध हटवल्यानंतर खोऱ्यातील शांतता कायम राखण्याचे आव्हान सुरक्षा दलासमोर आहे. खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी समाजकंटकाकडून अफवा पसरवण्यात येत आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन गृह विभागाकडून करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या