सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा – मुंबईच्या पराभवाची हॅटट्रिक

 स्थानिक क्रिकेटमधील दादा संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई क्रिकेट संघाला या वर्षी खेळवण्यात येत असलेल्या पहिल्याच स्पर्धेत सपाटून मार खावा लागला आहे. सूर्यपुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणाऱ्या मुंबई संघाला सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. हरयाणाने 8 गडी राखून मुंबईला धूळ चारली. या पराभवामुळे या संघाचे या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचेही मुंबईच्या सीनियर संघात पदार्पण झाले, पण त्याला यश मिळाले नाही.

मुंबईकडून मिळालेल्या 144 धावांचा पाठलाग करणाऱ्या हरयाणाने 2 गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. हिमांशू राणा (नाबाद 75  धावा) व शिवम चौहान (नाबाद 43 धावा) या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 117 धावांची अभेद्य भागीदारी करीत हरयाणाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अर्जुन तेंडुलकरने तीन षटकांत 34 धावा देत 1 फलंदाज बाद केला.

वडिलांसारखा श्रीगणेशा नाहीच

अर्जुन तेंडुलकरचे मुंबईच्या सीनियर संघाचे पदार्पण वडील सचिन तेंडुलकरसारखे झाले नाही. सचिन तेंडुलकरने पहिल्याच रणजी सामन्यात शतक झळकावले होते. अर्जुन तेंडुलकरला मात्र अकराव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आले. तो शुन्यावर नाबाद राहिला. तसेच गोलंदाजी करताना त्याच्या तीन षटकांत 34 धावा काढल्या गेल्या. चैतन्य बिष्णोईला त्याने 4 धावांवर बाद केले.

रथीमहारथी अपयशी

मुंबईने नाणेफेक जिंपून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या संघातील रथी-महारथी फलंदाजांना अपयशाचा सामना करावा लागला. आदित्य तरे (8 धावा), सूर्यपुमार यादव (0), सिद्धेश लाड (0), शिवम दुबे (0) यांच्याकडून निराशा झाली. यशस्वी जैसवाल (35 धावा), सरफराज खान (30 धावा) आणि अथर्व अंकोलेकर (37 धावा) यांनी थोडाफार प्रतिकार केला. हरयाणाच्या जयंत यादवने 4 आणि अरुण चपरानाने 3 फलंदाज बाद केले. हरयाणाच्या संघात युजवेंद्र चहल, जयंत यादव, राहुल तेवतीया आणि मोहित शर्मा हे अनुभवी गोलंदाज होते हे विशेष.

आपली प्रतिक्रिया द्या