तो सामना म्हणजे क्रीडाविश्वातील सर्वात मोठी लढाई

अमेरिकनसाठी क्रिकेटचे आयोजन नवे असले तरी हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात रविवार, 9 जूनला होणारा सामना सुपर बाऊलसारखाच आहे, याची त्यांना कल्पना असायला हवी. हा सामना म्हणजे क्रीडाविश्वातील सर्वात मोठी लढाई असल्याचे मत टी-20 वर्ल्ड कपचा ऍम्बेसेडर आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने बोलून दाखवले.

हिंदुस्थानविरुद्ध मला नेहमीच खेळायला आवडते. मी जेव्हा हिंदुस्थानविरुद्ध खेळलोय तेव्हा मला हिंदुस्थानी चाहत्यांकडून खूप सारे प्रेम आणि मान मिळाला आहे. उभय संघांतील सामना म्हणजे प्रचंड दबाव. दोन्ही संघ प्रतिभावान आहेत, बस त्यांना एकजूट दाखवून खेळण्याची गरज आहे. जो संघ संयम आणि धीराने खेळेल तोच जिंकेल. क्रिकेटच्या या छोटय़ा फॉरमॅटमध्ये स्पर्धेच्या संभाव्य विजेत्याची निवड करणे अवघड आहे. यंदा पाकिस्तान जिंकेल अशी आशा आहे, पण प्रबळ दावेदार निवडणे कठीण असल्याचे आफ्रिदीने सांगितले.