37 वर्षांनंतर किवी साखळीत गारद

वर्ल्ड कप कोणताही असो, अंतिम फेरीत किंवा अंतिम चार संघांमध्ये धडक मारणारा न्यूझीलंडचा संघ 37 वर्षांनंतर वर्ल्ड कपच्या साखळीतच गारद झाला आहे. 1987 साली हिंदुस्थानात झालेल्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडचा संघ साखळीतच बाद झाला होता. त्यानंतर झालेल्या वर्ल्ड कपमध्ये तो कधीही साखळीत बाद झाला नाही. तसेच टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातही त्यांचा संघ किमान दुसऱया फेरीत पोहोचायचाय. गेल्या वेळी तर ते उपांत्य फेरीत हरले होते.

टी-20 वर्ल्ड कपच्या गेल्या आठ स्पर्धापैकी 2009, 2010 आणि 2012 च्या स्पर्धांच्या सुपर एटमध्ये ते हरले होते. 2010 मध्ये ते थेट सुपर 10 मध्ये पोहोचले होते आणि त्यात हरून बाहेर फेकले गेले होते. तसेच 2007, 2016 आणि 2022 च्या वर्ल्ड कपची त्यांनी उपांत्य फेरी गाठली होती. 2021 च्या वर्ल्ड कपमध्ये ते उपविजेते ठरले होते. त्यांचा संघ अद्याप एकदाही टी-20 वर्ल्ड कप जिंकलेला नाही.

वन डे वर्ल्ड कपमधील त्यांची कामगिरी पाहिली तर ते सात वेळा उपांत्य फेरी खेळले आहेत. 2015 आणि 2019 साली ते सलग दोनदा उपविजेते ठरले. 1996 च्या वर्ल्ड कपमध्ये उपांत्यपूर्व फेरीत हरले होते आणि 2003 साली ते सुपर सिक्सच्या पुढे पोहोचू शकले नाही.