टी-20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा देणार, केंद्र सरकारचा निर्णय

सीमारेषेवर पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून वारंवार करण्यात येणाऱया हल्ल्यांमुळे हिंदुस्थानने पाकिस्तानी क्रिकेट संघासोबत द्विपक्षीय मालिका न खेळण्याचा निर्णय घेतला. पण या वर्षी हिंदुस्थानात टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. आयसीसीकडून आयोजित करण्यात येणाऱया स्पर्धांमध्ये हिंदुस्थान-पाकिस्तान आमने-सामने येत आहेत. या टी-20 वर्ल्ड कपमध्येही पाकिस्तानचा सहभाग आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानी क्रिकेटपटूंना व्हिसा देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी बीसीसीआयच्या बैठकीत याबाबतची माहिती दिली.

आर्थिक गणित जुळण्यासाठी

पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा नाकारला असता तर बीसीसीआयला या स्पर्धेच्या आयोजनाला मुकावे लागले असते. टी-20 वर्ल्ड कपमुळे बीसीसीआयला बक्कळ पैसा कमवता येणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने केंद्र सरकारशी चर्चा करून यावर तोडगा काढला. आर्थिक गणित जुळण्यासाठी बीसीसीआयने तत्काळ ही पावले उचलली हे विशेष.

पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींना व्हिसा नाही

हिंदुस्थानी सरकारने टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा क्रिकेट संघ आणि प्रसारमाध्यमांना व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींना व्हिसा देण्याचा निर्णय अद्यापि झालेला नाही, अशी माहिती जय शहा यांनी दिली.

पाकिस्तानचा क्रिकेट संघ पाच वर्षांनंतर हिंदुस्थानमध्ये खेळायला येणार आहे. याआधी 2016 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानी संघ हिंदुस्थानमध्ये आला होता. 25 मार्च 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहालीत शेवटचा सामना झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या