आजचा दिवस औपचारिक लढतींचा; कॅनडाविरुद्ध टीम इंडिया बाकावरील खेळाडूंना आजमावणार

विराटच्या फॉर्मची चिंता

टीम इंडियाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली टी-20 वर्ल्ड कपमध्ये अद्यापि आपल्या लौकिकास साजेसा खेळ करू शकलेला नाहीये. तीन सामन्यांत त्याने केवळ 5 धावा केल्या आहेत. कॅनडाविरुद्ध तो फॉर्मात परतण्यास आतूर असेल. याचबरोबर कर्णधार रोहित शर्माही पहिल्या सामन्यातील अर्धशतक सोडल्यास दोन लढतींत अपयशी ठरलेला आहे. शिवाय रवींद्र जाडेजाचीही अष्टपैलू चमक अद्याप बघायला मिळालेली नाहीये. त्यामुळे हे स्टार खेळाडूही कॅनडाविरुद्ध चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असतील.

टीम इंडिया लागोपाठच्या तीन विजयांसह टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपची सुपर एट फेरी गाठून आधीच निश्चिंत झाली आहे. त्यामुळे ‘अ’ गटात कॅनडाविरुद्ध  होणारा अखेरचा साखळी सामना हिंदुस्थानसाठी केवळ एक औपचारिकता असेल. त्यामुळे सुपर-8 च्या थरारापूर्वी बाकावरील खेळाडूंना आजमाविण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा काही स्टार खेळाडूंना विश्रांती देणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेपाळ आणि न्यूझीलंड विरुद्ध युगांडा अशा निव्वळ औपचारिकता पूर्ण करणाऱया लढती खेळल्या जाणार आहेत.

प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू हार्दिक पंडय़ा या स्टार खेळाडूंना पॅनडाविरुद्धच्या लढतीत विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. कारण टीम इंडियाला हे महत्त्वाचे खेळाडू सुपर-8 फेरीत ताजेतवाने हवे आहेत. बुमराहच्या जागेवर राखीव फिरकीपटू कुलदीप यादवला, तर पंडय़ाच्या ऐवजी संजू सॅमसनला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. फ्लोरिडाच्या पर्ह्ड लॉडरडेलमध्ये शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. याच मैदानावर शनिवारी हिंदुस्थान-पॅनडादरम्यान गटफेरीतील अखेरचा सामना रंगणार आहे, मात्र या लढतीवरही पावसाचे सावट असेल.

…तर नेपाळ सुपर एटमध्ये

दक्षिण आफ्रिका ‘ड’ गटातून आधीच सुपर एटसाठी पात्र ठरला असल्यामुळे त्यांच्यासाठी ही लढत औपचारिक ठरणार आहे. मात्र नेपाळने दक्षिण आफ्रिकेला हरवण्याचा इतिहास रचला तर त्यांच्यासाठी सुपर एटचे द्वार उघडले जाऊ शकते. नेपाळ आफ्रिका आणि बांगलादेशला हरवण्यात यशस्वी ठरला तर ते सुपर एटमध्ये पोहोचण्याचा भीमपराक्रम रचू शकतात. तसेच बांगलादेश आणि नेदरलॅण्ड्स या संघांनाही सुपर एटची संधी कायम आहे.

न्यूझीलंड-युगांडा बाद

अफगाणिस्तानच्या विजयी हॅटट्रिकमुळे ‘क’ गटातून न्यूझीलंड स्पर्धेबाहेर फेकला गेला आहे. त्यामुळे युगांडाविरुद्ध मोठा विजय नोंदवत ते आपल्या जखमेवर मलम लावण्याचा प्रयत्न करतील. ‘क’ गटातून विंडीज आणि अफगाणिस्तान हे दोन संघ सुपर एटमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे न्यूझीलंड, युगांडा आणि पापुआ न्यू गिनी हे संघ बाद झाले आहेत.