टी. नटराजनने इतिहास रचला, वीरेंद्र सेहवागने सलाम ठोकला

तमिळनाडूचा वेगवान गोलंदाज टी. नटराजन याचा सध्या स्वप्नवत प्रवास सुरू आहे. दुबईमध्ये इंडियन प्रिमियर लिग खेळताना त्याला स्वप्नातही वाटले नसेल की पुढील काही महिन्यात आपण टी-20, एक दिवसीय आणि कसोटीमध्ये पदार्पण करू. परंतु अवघ्या 44 दिवसांमध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉर्मेटमध्ये पदार्पण केले आणि कामगिरीने नावही उजळवले.

आयपीएल सुरु असताना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली. या दौऱ्यात वरुण चक्रवर्ती याला टी-20 संघात स्थान मिळाले. मात्र त्याला दुखापत झाल्याने त्याच्या जागी आयपीएलमध्ये आपल्या नावाची छाप उमटवलेल्या टी. नटराजनला संधी देण्यात आली. यानंतर नशीबाने अशी साथ दिली की पुढील 44 दिवसात त्याने टी-20, एक दिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विशेष म्हणजे एवढ्या कमी दिवसांमध्ये क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये पदार्पण करणारा तो हिंदुस्थानचा पहिला खेळाडू ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचा पीटर इंग्राम याने अवघ्या 12 दिवसात क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये पदार्पण केले होते. या यादीत दुसरे नाव पाकिस्तानच्या एजाज चिमा याचे असून त्याने 15 दिवसात, तर तिसऱ्या स्थानावरील दक्षिण आफ्रिकेच्या काईल एबट याने 16 दिवसात टी-20, एक दिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाचा सामना खेळला होता.

INDvsAUS कॅच सोडणे महागात पडले, लाबुशेनचे टीम इंडियाविरुद्ध पहिले शतक

पहिल्या दिवशी 2 बळी

दरम्यान, ब्रिस्बेन कसोटीपूर्वी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला दुखापत झाल्याने त्याच्या जागी टी. नटराजनला संधी मिळाली. नटराजनने गाबावर पदार्पणाच्या दिवशी 2 बळी घेतले. त्याने लाबुशेनला 108 आणि मॅथ्यू वेडला 45 धावांवर बाद करत टीम इंडियाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळवून दिली आहे.

सेहवागचा सलाम

दरम्यान, टी. नटराजन याचा स्वप्नवत प्रवास पाहून टीम इंडियाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने आनंद व्यक्त केला आहे. सेहवाने ट्विट करून म्हटले की, ‘नटराजनची कथा स्वप्नवत असून या तरुण खेळाडूला पाहून आनंद होत आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या