विंडीजचा विजयी धडाका; न्यूझीलंडला हरवत सुपर एटमध्ये दाखल

दोन वेळच्या जगज्जेत्या सहयजमान वेस्ट इंडीजने आपल्या विजयाचा धडाका कायम राखला. आज न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात विजयाच्या हॅटट्रिकसह टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या सुपर-एट फेरीत धडक मारली. त्यांनी न्यूझीलंडचा 13 धावांनी पराभव करत ‘क’ गटातून सुपर-एट फेरी गाठली. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, हिंदुस्थानपाठोपाठ सुपर-एट गाठणारा विंडीज चौथा संघ ठरला आहे. 68 धावांची नाबाद वादळी खेळी करणारा शेरफन रुदरफोर्ड या विजयाचा शिल्पकार ठरला. अल्झारी जोसेफ व गुडाकेश मोती यांनी न्यूझीलंडच्या फलंदाजीला सुरुंग लावला.

विंडीजकडून मिळालेल्या 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला 9 बाद 136 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. डेव्हन कॉन्वे (5), रचिन रवींद्र (10), कर्णधार केन विल्यम्सन (1) व डॅरिल मिचेल (12) ही आघाडीची फळी अपयशी ठरल्याने न्यूझीलंडला विजयी लक्ष्यापर्यंत पोहोचता आले नाही, मात्र तरीही फिन अॅलन (26), ग्लेन फिलिप्स (40) व मिचेल सॅण्टनर (नाबाद 21) यांनी विंडीजच्या गोलंदाजीचा प्रतिकार करत सामना जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. अॅलनने 23 चेंडूत 3 चौकारांसह एक षटकार लगावला. फिलिप्सने 33 चेंडूंत 3 षटकारांसह 2 चौकार ठोकले. सॅण्टनरनेही अखेरच्या षटकात फटकेबाजी केली, पण तोपर्यंत जरा उशीर झाला होता. विंडीजकडून अल्झारी जोसेफने 4, तर गुडाकेश मोतीने 3 फलंदाज बाद करीत न्यूझीलंडच्या फलंदाजीतील हवा काढून घेतली. अकिल होसन व आंद्रे रसल यांनी प्रत्येकी एक विकेट टिपला.

आघाडीच्या फळीला फ्लॉप शो
त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना एक वेळ विंडीजची 6.3 षटकांत 5 बाद 30 धावा अशी दुर्दशा उडाली होती. ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात जॉन्सन चार्ल्सचा शून्यावर त्रिफळा उडवून न्यूझीलंडला सनसनाटी सुरुवात करून दिली. त्यानंतर निकोलस पुरन (17), रोस्टन चेस (0), कर्णधार रोवमन पॉवेल (1) मग दुसरा सलामीवीर ब्रेंडन किंग (9) ही आघाडीची फळी तंबूत परतल्याने विंडीजचा डाव संकटात सापडला.

रुदरफोर्डचे झुंजार अर्धशतक
विंडीजचा डाव संकटात असताना मधल्या फळीतील शेरफन रुदरपर्ह्डने वादळी अर्धशतकी खेळी करीत डाव सारवला. त्याने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरत विंडीजला 9 बाद 149 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. रुदरपर्ह्डने 39 चेंडूंत 6 उत्तुंग षटकार व 2 चौकारांसह आपली नाबाद अर्धशतकी खेळी सजवली. त्याला अकिल होसेन (15), आंद्रे रसल (14) व रोमारियो शेफर्ड (13) यांनी साथ दिली. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने 3, तर टीम साऊदी व लॉकी फर्ग्युसन यांनी 2-2 फलंदाज बाद केले. जेम्स निशाम व मिचेल सॅण्टनर यांना 1-1 विकेट मिळवले.