बांगलादेश सुपर एटच्या ट्रॅकवर; नेदरलॅण्ड्सवर केली 25 धावांनी मात

सुपर एटमध्ये स्थान मिळवण्यासाठी असलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण सामन्यात बांगलादेशने नेदरलॅण्ड्सचा 25 धावांनी पराभव केला आणि सुपर एटसाठी ड गटातून आपला दावा अधिक मजबूत केला. आता बांगलादेश 4 गुणांसह दुसऱया स्थानावर असून त्यांची शेवटची लढत नेपाळविरुद्ध रंगेल तर नेदरलॅण्ड्सचा चौथा सामना श्रीलंकेविरुद्ध खेळला जाणार आहे. हे दोन्ही सामने 17 जूनला पहाटे खेळले जाणार आहेत.

बांगलादेशच्या 160 धावांचा पाठलाग करताना नेदरलॅण्ड्सने विकेट गमावले, पण धावांचा पाठलाग सोडला नाही. त्यामुळे ते शेवटपर्यंत विजयासाठी प्रयत्न करत होते. सिब्रॅण्ड एंजलब्रेश्ट आणि कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने चौथ्या विकेटसाठी 42 धावांची भागी करत डचला विजयासमीप नेले. त्यांना 33 चेंडूंत 49 धावांची गरज होती आणि ही जोडी फुटली. त्यानंतर डचने आपले नियंत्रणच गमावले आणि ते मागे पडले. अखेर ते 25 धावांनी हरले. रिशाद होसेनने 33 धावांत 3 विकेट घेत बांगलादेशला विजय मिळवून दिला. नेदरलॅण्ड्सने टॉस जिंकून बांगलादेशला फलंदाजीची संधी दिली.आर्यन दत्तने सुरूवातीलाच बांगलादेशला दोन हादरे दिले, पण त्यानंतर शाकिब अल हसनच्या 46 चेंडूंतील 64 धावांच्या नाबाद आणि झुंजार खेळीने बांगलादेशला 159 अशी दणदणीत धावसंख्या उभारून दिली. शाकिबने तंझिद हसन (35) आणि महमदुल्लाह (25) यांच्याबरोबर महत्त्वाच्या भागीदाऱया केल्यामुळेच बांगलादेशही आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.