टी-20 विश्वचषकावरील बहिष्कारावरून पाकचा यू टर्न

435

टी-20 विश्वचषक ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) स्पर्धा असते, त्यावर बहिष्कार टाकण्याचा प्रश्नच येत नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला फक्त खेळाडूंच्या सुरक्षेविषयी चिंता आहे. खेळाडूंसाठी व्हिसा आणि इतर गोष्टी जलद मिळणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे हिंदुस्थानातील 2021 च्या टी-20 विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा शब्दांत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ वासिम खान यांनी आपले बहिष्काराचे अस्त्र म्यान केले आहे.

टीम इंडियाने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानच्या यजमानपदाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत खेळण्यास नकार दिल्याने पाकिस्तानवर आशिया चषकाचे यजमानपद धोक्यात आले आहे. त्यानंतर बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या संस्थांमध्ये सुरू असलेल्या सुंदोपसुंदीने आता एक वेगळेच वळण घेतले आहे. हिंदुस्थानने पाकिस्तानात होणाऱया आशिया चषकात सहभागी होण्यास नकार दिल्यानंतर, पाकिस्तानचं यजमनापद काढून घेण्यात आलं. आशियाई क्रिकेट परिषद सध्या आशिया चषकासाठी वेगळ्या ठिकाणाचा विचार करत आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासिम खान यांनी हिंदुस्थानी संघ आशिया चषकात सहभागी झाला नाही तर पाकिस्तानही 2021 साली हिंदुस्थानात होणाऱया टी-20 विश्वचषकात सहभागी होणार नाही अशी धमकी दिली होती. मात्र जागतिक विरोधासह पाकिस्तानी क्रिकेट शौकिनांनीही या धमकीवर नाराजी व्यक्त केल्यानंतर वासिम खान यांनी आपल्या वक्तव्यावरून यू टर्न घेतला आहे.

आम्हाला आमच्या खेळाडूंच्या भवितव्याची चिंता आहे. त्यामुळे स्पर्धेतून माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही. आशिया चषकाच्या यजमानपदावरून मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. – वासिम खान, पीसीबीचे सीईओ

आपली प्रतिक्रिया द्या