आज भीती खरी ठरणार! अमेरिका, अफगाणिस्तानचे स्रुपर एटवर आज शिक्कामोर्तब

24 तासांच्या आत दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज यांनी अपेक्षेप्रमाणे विजयाच्या हॅटट्रिकसह सुपर-एटमध्ये धडक मारली. आता काही अनपेक्षित निकाल लागण्याची दाट शक्यता असून गेले काही दिवस असलेली भीती खरी ठरणार आहे. अफगाणिस्तान पापुआ न्यू गिनीविरुद्धचा सामना जिंकून ‘क’ गटातून सुपर-एटसाठी पात्र ठरणार आहे तसेच ‘अ’ गटातून यजमान अमेरिका एकही सामना न जिंकणाऱया आयर्लंडला नमवत पदार्पणातच सुपर-एटमध्ये धडक मारण्याचा इतिहास रचणार. हे दोन्ही पराक्रम शुक्रवारी रचले जाणार असल्यामुळे एकीकडे पाकिस्तान आणि दुसरीकडे न्यूझीलंड या संभाव्य दावेदारांचा टी-20 वर्ल्ड कपमधून पत्ता कट होणार आहे.

अमेरिकेच्या फलंदाजीला अॅरॉन जोन्स आणि आंद्रिस गोस यांची ताकद लाभलीच आहे. तसेच सौरभ नेत्रावळकर, जसदीप सिंग आणि अली खान यांच्या अचूक माऱयानेही त्यांचा संघ संतुलित केला आहे. त्यामुळे फारशी चमक न दाखवू शकलेल्या आयर्लंडकडून अपेक्षा बाळगणे पह्ल ठरू शकते. आयर्लंडचा हिंदुस्थानविरुद्ध दारुण पराभव झाला होता तर पॅनडाविरुद्धही त्यांना 137 धावांचा पाठलाग करताना 12 धावा कमी पडल्या होत्या.

अमेरिकेला रोखणे कठीण
यजमान अमेरिकेला बुधवारी हिंदुस्थानविरुद्धच्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला असला तरी त्यांनी संभाव्य दावेदार असलेल्या हिंदुस्थानच्या डोळय़ापुढे अंधारी आणली होती. तसेच त्यांनी पहिल्या दोन्ही लढतींत पॅनडा आणि पाकिस्तानचा सहज पराभव करताना ‘हम भी हैं जोश में’ असल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळे आयर्लंडविरुद्धचा सामनाही ते विनाअडथळा जिंकतील. पण त्यांचा हा पराभव पाकिस्तानच्या जिव्हारी लागू शकतो. सध्या पाकिस्तान अल्लाहकडे अमेरिकेच्या पराभवाची विनवणी करताहेत. जर अल्लाहने त्यांची विनवणी ऐकली नाही तर पाकिस्तानचे आयर्लंडविरुद्ध खेळण्यापूर्वीच पॅकअप होईल.

पठाण का बच्चा कमाल करणार
टी-20 वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱया संघात अमेरिकेपाठोपाठ अफगाणिस्तानचेही नाव घ्यावेच लागेल. अफगाणिस्तानने युगांडावर विक्रमी विजय मिळवत आपली धमाकेदार सुरुवात केली होती. त्यानंतर न्यूझीलंडचा 75 धावांत खुर्दा पाडत वर्ल्ड कपमधील आणखी एका धक्कादायक विजयाची नोंद केली. अफगाणिस्तान असा एकमेव संघ आहे, ज्याने आपल्या प्रतिस्पर्धी संघाला शंभरीच्या आतच गुंडाळण्याचा पराक्रम केलाय. त्यामुळे गुणतालिकेत एकीकडे फलंदाजांमध्ये रहमानुल्लाह गुरबाज अव्वल आहे तर गोलंदाजांमध्ये फझलहक फारुकी. हा अव्वल असलेला संघ सलग तिसऱया सामन्यातही आपल्या प्रतिस्पर्ध्यांना ऑलआऊट करण्याची किमया करून दाखवेल, असा विश्वास कर्णधार राशीद खानने बोलून दाखवला आहे.