‘तान्हाजी’चा दबदबा कायम, वरुण-कंगना आणि आदित्यवर एकटा अजय भारी

छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाची घोडदौड सुरुच आहे. 10 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट एक महिन्यानंतरही गर्दी खेचत आहे. ऐतिहासिक घटनांवर आधारित या चित्रपटाने कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ हा अजय देवगण याचा 100 वा चित्रपट आहे. प्रदर्शनापासून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 267.76 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये कमाईच्या बाबतीत ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ पहिल्या स्थानावर आहे.

अजयच्या या चित्रपटासोबतच दीपिका पदुकोण हिचा बहुचर्चित ‘छपाक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री असतानाही हा चित्रपट आतापर्यंत फक्त 34.08 कोटींची कमाई करू शकला आहे. तर 17 जानेवारीला प्रदर्शित झालेला ‘जय मम्मी दी’ हा चित्रपट फक्त 2.51 कोटी कमाई करू शकला.

‘छपाक’ आणि ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ या चित्रपटानंतर वरुण धवन आणि श्रद्ध कपूर यांचा ‘स्ट्रीट डान्सर-3D’ हा चित्रपट 24 जानेवारीला प्रदर्शित झाला. हा चित्रपट आतापर्यंत 66.56 कोटी कमाई करू शकला आहे. तर कंगना रनौतचा ‘पंगा’ हा चित्रपट 26.69 कोटींचीच कमाई करू शकला आहे. सैफी अली खानच्या ‘जवानी जानेमन’ या चित्रपटाने 25.18 कोटींची कमाई केली आहे. तर कश्मीरी पंडितांवर आधारित ‘शिकारा’ या चित्रपटाने 4.95 कोटींची, ‘मलंग’ने 29.40 कोटींची कमाई केली आहे. या सर्व चित्रपटांच्या कमाईची टोटलही ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’च्या आसपास नाही. आगामी काळातही हा चित्रपट गर्दी खेचत राहील आणि 300 कोटींचा टप्पा पार करेन अशी शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या