तारक मेहता का उल्टा चष्माचा सोढी 25 दिवसांनी घरी परतला; सांगितले बेपत्ता होण्याचे कारण…

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील अभिनेता गुरुचरण सिंग गेल्या 25 दिवसांपासून बेपत्ता होता. गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यामुळे त्याचे पालकही चिंतेत होते. गुरुचरण 22 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता मुंबईला निघाल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. मात्र, तो मुंबईला पोहोचला नाही आणि त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्कही झाला नाही. आता गुरुचरण सिंगच्या कुटुंबियांसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची माहिती मिळाली आहे. तारक मेहताचा सोढी 25 दिवसांनी घरी परतला आहे.

गुरुचरण सिंग जवळपास 26 दिवस बेपत्ता राहिल्यानंतर 17 मे रोजी घरा परतला. गुरुचरण घरी परतल्यावर त्याची दिल्ली पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्याने घरापासून लांब असल्याचे कारण सांगितले आहे. ‘धार्मिक यात्रेला’ जाण्यासाठी घर सोडले होते. राहत्या घरातून बाहेर पडल्यावर अमृतसर आणि लुधियानाच्या गुरुद्वारांमध्ये राहिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

गुरुचरण सिंग हा एका पंथाचा अनुयायी होता. त्याला ध्यान करण्यासाठी हिमालयात जायचे होते. मात्र गुरुचरण सिंग घरी परतला. कारण कुटुंबच आपलं सर्वस्व आहे हे त्याला उमगलं आणि म्हणूनच तो घरी परतला, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्याप्रकरणी पोलीस तारक मेहता का उल्टा चष्माच्या सेटवरही पोहोचले होते. अभिनेता बेपत्ता झाल्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. पण, आता गुरुचरण सिंग म्हणजे सोढी आपल्या घरी परतला आहे.

गुरुचरण सिंग सुखरुप घरी परतल्याने त्याच्या कुटुंबाला आनंद झाला आहे. ‘गुरुचरण सिंगला घरी येऊन दोन दिवस झाले आहेत. त्यांची प्रकृती ठीक आहे. कोणीही त्याचे अपहरण केलेले नाही. याबाबतची सगळी माहिती आम्ही पोलिसांना दिली आहे, असे त्याचे वडील हरजीत सिंग म्हणाले.