तबलीगी जमातच्या 14 जणांना मशिदीत आणि घरात आसरा दिला, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

2090

तबलीगी जमातच्या 14 जणांना मशिदीत आणि घरात आसरा दिल्याने संगमनेरातील स्थानिक पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

संगमनेर शहरात लॉकडाऊन करण्यात आल्याने बाहेरच्या लोकांना शहरात येण्यास मनाई करण्यात आली आहे. देशाच्या आणि राज्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना घराच्या बाहेर न पडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. गर्दी टाळण्याच्या आणि बाहेरून आलेल्या लोकांच्या संपर्कात न येण्याच्या सूचनाही करण्यात आलेल्या असताना संगमनेर मध्ये मात्र त्याचे उल्लंघन होताना दिसत आहे.

नेपाळमधील तबलीगी जमातच्या 14 जणांना संमनेरमध्ये आसरा देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या 14 जणांना ताब्यात घेतलं आहे. तसेच या 14 जणांना आसरा देणाऱ्या मोमीनपुरा भागातील 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या 14 जणांसह मोमीनपुरा भागातील या पाच जणांची आणि त्यांच्या कुटुंबीयांसह शेजाऱ्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे. हे लोक करोनाबाधित आहेत की नाही? याचाही तपास करण्यात येणार आहे.

दरम्यान, नेपाळमधील तबलीग जमातच्या लोकांना संगमनेरमध्ये आसरा देण्यात आल्याच्या घटने नंतर खळबळ उडाली आहे. या 14 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आल असतानाही यातील सहा जण बाहेर फिरत असल्याच निदर्शानात आल्याने सहा जणांना एका रूग्णालयात विलीगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याचे समजते.  पोलिस नाईक सलीम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेरातील हाजी जलीमखान पठाण, हाजी जियाबुद्दीन शेख, हाजी जैनुद्दीन परावे, हाजी जैनुद्दीन मोमीन, रिजवान शेख या पाच जणांवर कलम 188, 269, 271 साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 चे कलम 2, 3, 4 महाराष्ट्र कोविड 19 तसेच आपत्ती व्यवस्थापन आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पो.नि. अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या