तबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…

जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार उडवून दिला आहे. हिंदुस्थानातही गेल्या 24 तासात 380 प्रकरण समोर आली असून रुग्णांचा आकडा 1600 पार गेला आहे. याच दरम्यान, देशाची राजधानी दिल्ली येथे हजरत निजामुद्दीन मरकज येथे आयोजित झालेल्या धार्मिक आयोजनावरून रणकंदन सुरू आहे. या कार्यक्रमात सहभागी असणार्‍यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आलीे. हे लोक आपआपल्या राज्यात परतले असून यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतली असून कारवाई सुरू केली आहे. देशात एवढे मोठे संकट असताना धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली लोक जमवून बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यावर लोकांनी निशाणा साधला आहे. बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि निर्माती फराह खान यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्ली शहरातील निजामुद्दीन येथे तबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर प्रतिक्रिया देताना नवाज म्हणाला की, सरकारने लॉकडाऊन लागू केला असेल तर देशातील प्रत्येक नागरिकाला निर्णयाचा सन्मान राखत तो पाळणे गरजेचे आहे. सरकार लॉकडाऊन बोलत आहे म्हणजे सर्व लॉक ठेवायला हवे. तुम्ही कोणत्या धर्माचे आहेत याच्याशी सरकारी निर्णयाचे काही देणेघेणे नाही. सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनचे उल्लंघन करून तुम्ही फक्त स्वतःचा नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांचा जीवही धोक्यात घालत आहेत, असेही तो म्हणाला.

फराहचे ट्वीट
नवाजसह फराह खान हिने देखील ट्विट करून यावर आपले मत व्यक्त केले आहे. देशातील सध्याची स्थिती पाहता तबलिग जमातद्वारे अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करणे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. तसेच याला धार्मिक रंग देऊ नका असेही आवाहन तिने केले आहे. जगावर एवढे मोठे संकट ओढवले असताना धर्माच्या नावाखाली असे लोक एकत्र करणे चूक आहे असेही फराह ट्विटमध्ये म्हणाली.

आपली प्रतिक्रिया द्या