पोपटाच्या हल्ल्यात डॉक्टर जखमी, मालकाला 74 लाख रुपये दंडासह दोन महिन्याचा तुरुंगवास

घरात कुत्रा, मांजर किंवा पक्षी पाळत असाल तर ही तुमच्यासाठी बातमी आहे. तायवानमध्ये एकाला पोपट पाळणे महागात पडले आहे. या पोपटाने एका डॉक्टरवर हल्ला करुन जखमी केले. संतापलेल्या डॉक्टरने पोपटाच्या मालकाला थेट कोर्टात खेचले. त्यावर न्यायालयाने पोपटाच्या मालकाला 74 लाख रुपयांचा दंड आणि सोबत दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

तायवानच्या सेंट्रल न्यूज एजन्सीनुसार, पोपट अचानक डॉक्टर लीन यांच्या पाठीवर बसला आणि आपले पंख फडफडू लागला. ज्यानंतर डॉक्टर घाबरले आणि खाली पडले. यामध्ये त्यांचे पाठिचे हाड तुटले आणि मांडीजवळचे हाड सरकले. त्यामुळे डॉ.लिन यांनी त्याचा मालक हुआंग याला कोर्टात खेचले. नुकसान भरपाई म्हणून त्याने दावा करत सांगितले की, त्यांना एका आठवड्यासाठी रुग्णालयात राहावे लागले आणि तीन महिने विशेष काळजी घ्यायला सांगितली. म्हणजे जवळपास सहा महिने त्यांना पूर्ण बरे व्हायला लागले. त्यामुळे त्यांना काम करता आले नाही.

डॉ.लिन हे एक प्लास्टिक सर्जन आहेत आणि त्यांना एखादी शस्त्रक्रिया करण्यासाठी तासनतास उभे राहावे लागते. मात्र दुखापतीमुळे त्यांना कामावर जाता आले नाही आणि त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यांच्या वकिलाने सांगितले की,आता ते चालू शकतात, पण ते बराच वेळ उभे राहिले ते त्यांचे पाय सुन्न होऊन जातात. तायवान जिल्हा कोर्टच्या प्रसासकिय विभागाच्या मीडिया प्रवक्त्यानुसार हे प्रकरण दुर्लभ आहे.

मीडिया वृत्तानुसार, न्यायालयाने निर्णय देताना सांगितले की, पोपटाचा मालक हुआंग यांच्या बेजबाबदारपणामुळे डॉ.लिन खाली पडले. न्यायाधिशांनी सांगितले की,  60 सेमी पंख आणि 40 सेमी उंच असलेल्या पोपटाच्या मालकाने सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेणे गरजेचे होते. हुआंग यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा स्विकार केला आणि मात्र त्याच्यामते पोपट हिंसक पक्षी नाही आणि ठोठावलेला दंड फार जास्त असल्याचे सांगत आता उच्च न्यायालात धाव घेतली आहे.