अमेरिकेच्या ‘या’ निर्णयामुळे ड्रॅगन चवताळला; दिला गंभीर इशारा

11039

चीनच्या वुहानमधून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेने चीन विरोधात मोर्चा उघडला आहे. चीनच्या विस्तारवादी धोरणाला रोखण्यासाठी अमेरिका तैवानच्या मदतीला धावून गेला आहे. अमेरिकेने तैवानला ‘पीएससी 3 एयर डिफेंस मिसाइल सिस्टम’ विकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चीनला मिरच्या झोंबल्या आहेत. चीनने इशारा दिला आहे की असे झाल्यास अमेरिकेला कारवाईला सामोरे जावे लागेल.

तैवानवर चीन नेहमीच आपला दावा करत आला आहे. मात्र तैवान स्वत: ला स्वतंत्र आणि लोकशाही असलेला देश म्हणतो. सध्या चीन आणि तैवानमधील तणावही शिगेला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेने तैवानला मदत केलेली चीनला बिलकूल खपले नाही.

तैवानला पीएससी 3 एयर डिफेंस मिसाइल सिस्टम देण्यास विरोध करत चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी मीडियाला सांगितले की, अमेरिकेकडून तैवानला मिसाईलच्या विक्रीचा चीन कडाडून विरोध करत आहे. अमेरिकेने अखंड चीनच्या सिद्धांताचे पालन केले पाहिजे.

अमेरिकेच्या या निर्णयाचा बदला घेत चीनने शस्त्रे बनविणारी सर्वात मोठी कंपनी ‘लॉकहीड मार्टिन’वर बंदी घातली आहे. ही कंपनी तैवानला पीएससी 3 एअर डिफेन्स मिसाईल सिस्टमची विक्री करणार आहे.

कंपनीवर बंदी घालण्याच्या निर्णयाच्या संदर्भात चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ म्हणाले की, चीनने या कराराविरूद्ध सर्व आवश्यक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही या कराराचे मुख्य कंत्राटदार लॉकहीड मार्टिन यांच्याविरूद्ध सर्व निर्बंध लादू.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने तैवानच्या पॅट्रियॉट एडवांस्ड कॅपेबिलिटी (पीएसी-3) हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची विनंती स्वीकारल्यानंतर चीन चवताळून उठला आहे. या शस्त्राच्या खरेदीसाठी 62 कोटी डॉलर्स खर्च होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या