राष्ट्रद्रोही कृत्य करणाऱ्या काँग्रेसवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

सामना प्रतिनिधी । नगर

राजस्थानमधील काँग्रेस सरकारने दहावीच्या पुस्तकातील धड्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ‘देशभक्त’ आणि ‘क्रांतीकारी’ असा उल्लेख काढून त्याऐवजी त्यांचा ‘कारागृहातून बाहेर येण्यासाठी इंग्रजांची क्षमा मागणारी व्यक्ती’ असा उल्लेख केला आहे, त्याचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते, असे समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अरविंद पानसरे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

काँग्रेसच्या मणीशंकर अय्यर यांनी अंदमानातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या काव्यपंक्ती काढून टाकण्याचे देशद्रोही आणि अश्‍लाघ्य कृत्य केले होते. त्याच मार्गाने काँग्रेसचे मार्गक्रमण चालू आहे. निव्वळ सावरकर द्वेषापायी राजस्थानमधील काँग्रेस सरकारकडून पाठ्यपुस्तकांमध्ये पालट केला आहे. भाजपवर शिक्षणाचे भगवेकरण करण्याचा आरोप करणार्‍या काँग्रेसकडून शिक्षणाचे ‘ब्रिटिशी’करण केले जात आहे. यातून ‘काँग्रेस ब्रिटीशधार्जिणी आहे’, हे स्पष्ट होते. ज्यांना दोन काळ्या पाण्याची शिक्षा झाली, ज्यांनी हजारो क्रांतीकारकांना दिशा दिली, साहित्य लिहिले, भाषाशुद्धीचे मोठे कार्य केले, त्या स्वा. सावरकरांची प्रतिमा विद्यार्थ्यांमध्ये डागळण्याचा अश्‍लाघ्य प्रकार काँग्रेसने केला आहे.

मुळात ‘अमेन्स्टी पिटशन’ म्हणजे माफीनामा नव्हे, तर राजकीय गुन्हे करणार्‍यांना सर्वांसाठी असणारी सर्वसाधारण सवलत. तसेच ब्रिटिश शासनाने स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतीय राष्ट्रभक्त आरि तत्त्वज्ञ’ जाहीर केले असून तसा फलक ‘ग्रेटर लंडन कौन्सिल’ने सावरकर पूर्वी रहात असलेल्या निवास्थानाबाहेर लावला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफी मागणारा म्हणणार्‍या काँग्रेसने केवळ स्वातंत्र्यवीर सारवकरांचा नव्हे, तर समस्त भारतीय स्वातंत्र्यसैनिकांचा आणि कोट्यवधी राष्ट्रप्रेमी जनतेचा भावना दुखावल्या आहेत. अशा राष्ट्रद्रोही पक्षावर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी अरविंद पानसरे, महाराष्ट्र राज्य प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती यांनी केली आहे.