बारसू ग्रामस्थांवर अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा! शिवसेनेची पोलीस महासंचालकांकडे मागणी

रत्नागिरी जिह्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या बारसूतील ग्रामस्थांवर अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलीस अधिकाऱयांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पोलीस महासंचालकांकडे केली.

अंबादास दानवे यांनी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची आज भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आदेश दिल्यामुळे आंदोलनकर्त्या नागरिकांना पोलिसांकडून मारहाण झाली. पोलीस हे फक्त राजकीय दबावापोटी करत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी एका मुलीने तक्रार मांडली म्हणून पोलीस अधीक्षकांनी तिला बोलावून धमकी दिल्याचा प्रकारही घडला आहे. ही बाब दानवे यांनी पोलीस महासंचालकांकडे मांडली.

शासनाने या प्रकल्पासाठी भूसंपादन केले नसतानादेखील ग्रामस्थांना विचारात न घेता प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने तिथे माती सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. त्याविरोधात पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. त्या आंदोलकांवर अमानुष लाठीमार आणि अश्रुधुराचा मारा करण्यात आला, आंदोलनातील कार्यकर्त्यांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेण्यात आले, महिलांना लाठीमार करून फरफटत नेण्यात आले, खोटे गुन्हे दाखल करून आंदोलकांवर दबाव आणला जात आहे, प्रकल्पस्थळी ग्रामस्थ आणि प्रसारमाध्यमांना मज्जाव करण्यात आला आहे. जमावबंदी आणि पोलिसांच्या गस्तीमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. मुंबईतील बारसूवासीयांनाही नोटिसा बजावून गावी न येण्यासाठी बजावण्यात आले आहे. अशा बाबी दानवे यांनी निवेदनात मांडल्या आहेत.

यावेळी शिवसेना खासदार विनायक राऊत आणि बारसूच्या ग्रामस्थांनीही पोलिसांच्या अत्याचाराबाबत महासंचालकांना माहिती दिली.