थोडी काळजी घेतली तर…

842

नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने २४ आठवडय़ांच्या गर्भपाताला परवानगी देऊन आईची प्रकृती आधी महत्त्वाची याची ग्वाही दिली. पण याबाबतीत वेळीच काही गोष्टींची काळजी घेतली तर अशा प्रकारच्या घटना नक्कीच टाळता येतील.

आई होणं.. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक आनंदाची घटना… पण बऱ्याचदा प्रकृतीच्या काही अपरिहार्य कारणांमुळे गर्भपातासारख्या अत्यंत वेदनादायी घटनेला सामोरे जावे लागते. पण जर काही गोष्टींची काळजी घेतली तर अशा दुर्घटना नक्कीच टाळता येतील. याबाबतीत जे. जे. रुग्णालयाच्या डॉ. रेखा डावर सांगतात की, बहुतेक नैसर्गिक गर्भपात गरोदरपणाच्या पहिल्या १२ आठवढ्यांत घडून येतात.

बाळाची चाहूल लागताच…

प्रत्येक गर्भवती महिलेने दिवस गेल्याचे लक्षात येताच स्त्रीरोगतज्ञांकडे जाणे आवश्यक असतं. त्यानंतर १६ ते १८ आठवड्यानंतर एक सोनोग्राफी (लोकल ट्रान्समिशन सिटीस्कॅन) करणे गरजेचे आहे. कारण यावेळी बाळाचे पाठ, मणके, हात, इत्यादी अवयव स्पष्ट दिसतात. त्यामुळे बाळातील ९० ते ९५ टक्के वैगुण्य याचवेळी कळतात आणि डॉक्टरांच्या समितीला गर्भपाताचा निर्णय घेता येतो. काही वैगुण्य २० आठवड्यानंतर लक्षात आली तर त्यांना स्पेशल केस म्हणून परवानगी दिली जाते.

नावनोंदणी महत्त्वाची

बऱयाचदा गावाकडील किंवा काही अशिक्षित गर्भवती महिला नावनोंदणी करत नाहीत. सरकारी आणि महापालिकेच्या रुग्णालयांत किंवा आपल्या सोयीच्या खासगी रुग्णालयांत नाव नोंदवणे गरजेचे आहे. यामुळे ऐनवेळी घरच्यांची धावपळ होणार नाही तसेच यामुळे स्त्रीरोगतज्ञांचे मार्गदर्शन मिळण्यास मदत होते.

सोनोग्राफी हवीच

४ महिन्यानंतर सोनोठाफी कराच. त्यासाठी २४ आठवडय़ांवर थांबू नका. बाळातील वैगुण्य आईला कळत नाहीत, कारण आईला काहीच त्रास होत नसतो. तरीही गर्भवती महिलेने २-३ महिने झाले की, डॉक्टरांकडे जावे, सोनोग्राफी करून घ्यावी. त्यामुळे गर्भ कसा आहे, ते समजते. काही महिला गरोदर राहिल्यानंतर ७ व्या महिन्यात नाव घालूया, असा विचार करून रुग्णालयात नाव दाखल करायला टाळाटाळ करतात, मात्र सोनोग्राफीसारख्या तंत्रज्ञानामुळे ४ महिन्याचा गर्भ असताना सोनोग्राफी केली तर हात, पाय, डोके, मणके, ह्रदय सगळे अवयव स्पष्ट दिसतात. गर्भातील वैगुण्यही तेव्हाच लक्षात येतात.

तपासणी

आई आणि बालकाच्या आरोग्याच्या दृष्टिनेसुद्धा हिमोग्लोबिन, ब्लडप्रेशर, यासारख्या महत्त्वाच्या तपासण्या करून घ्याव्यात. स्त्रीयांनी नोंदणी लवकर करून आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार म्हणजे आहार, व्यायाम, औषधे घेतली पाहिजेत आणि सोनोठाफी ४ महिन्यांनंतर (१६ ते १७ आठवड्यांदरम्यान) करणे महत्त्वाचे आहे. आपल्याकडे सरकारी आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ती मोफत केली जाते. तिचा फायदा करून घेणे आवश्यक आहे.

पालकांना समुपदेशनाची गरज

आपल्या देशात गर्भनिदानपूर्व समुपदेशनाची मोठय़ा प्रमाणात कमतरता आहे. बाळाला जन्म देणाऱ्या माता-पित्यांना समुदेशनची आवश्यकता असते, यामध्ये सर्वसामान्याबरोबरच श्रीमंतांचे प्रमाणही जास्त आहे. काही महिलांचा दोन ते तीन वेळा नैसर्गिक गर्भपातही होतो. याचे कारण पालकांनी शोधणे आवश्यक आहे. जेणेकरून दुसऱ्या गर्भाला त्याचा त्रास होऊ नये. सगळेच आजार सोनोग्राफीमध्ये कळतात असे नाही. गरोदरपणात कोणती औषधं घ्यायची, आहार कसा असावा, अल्कोहोल, धूम्रपान न करणे, ऑण्टिबायोटिक घेऊ नयेत, याबाबत सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे.

आईने घ्यायची काळजी

गर्भात निर्माण होणाऱ्या वैगुण्याबाबत फक्त ते बाळच दोषी असतं असं नाही, तर त्यासाठी आणखीही काही कारणं ठरू शकतात. त्यातली बहुतांश कारणं थेट आईकडेच बोट दाखवतात. बाळंतपणात एक्स-रे न काढणं, बाळ होणाऱया आईला एखादा संसर्गजन्य रोग झाला असला तरी त्याकडे दुर्लक्ष करणे, आहाराची हेळसांड, व्यायाम पार सोडून देणे अशा काही आईच्या चुकांमुळे तिच्या गर्भातील बाळाला वैगुण्य येऊ शकतात. त्यासाठी आईने विशेष काळजी घ्यायला हवी. कारण जसजसा गर्भाचा अवधी वाढत जातो तसतसा आईच्या जिवाला धोका निर्माण होत असतो.

आपली प्रतिक्रिया द्या