गप्पांची गुंगी

29

>> आशीष बनसोडे

प्रवासात अनेकदा सहप्रवासी ओळख काढून गप्पांचा फड रंगवतात. रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या प्रवासात तर कोणी बडबड्य़ा प्रवासी भेटलाच की आपल्यालाही तेवढाच टाइमपास होतो. बोलता बोलता बिस्कीट, वडापाव, उपमा आदी खाद्यपदार्थ किंवा कोल्ड्रिंक, पाणी घ्या असा आग्रह सहप्रवाशाकडून केला जातो. आपणही त्यांचा मान राखत थोडं का होईना खातो किंवा पाण्याचा एक घोट तरी घेतोच. पण नेमका इथेच घात होतो. काही भामटे प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन आपले काम तमाम करतात.

कुठल्याही अनोळखी व्यक्तींकडून खाद्यपदार्थ किंवा शीतपेय घेऊ नका असा इशारा वारंवार पोलिसांकडून दिला जातो, पण तरीदेखील नागरिक ती चूक करतातच. कांदिवलीच्या अलीखान नगरात राहणारे धनकराजन केश्वनी (७०) यांनी अशीच एक चूक केली आणि नको ते संकट ओढवून घेतले. केश्वनी हे हाप्पा एक्प्रेसने प्रवास करीत होते. साहिल अहमद अब्दुल रेहमान मन्सुरी (३३) आणि नीरज उमाशंकर यादव (२९) हे दोघे केश्वनी यांच्या शेजारी सहप्रवासी म्हणून येऊन बसले. एकमेकांना ओळखत नाही असे चित्र त्यांनी उभे केले. साहिलने बोलण्यास सुरुवात केली. त्याने नीरज आणि केश्वनी यांची ओळख करून घेतली आणि गप्पांचा फड रंगवला. पनवेल स्थानक सोडताच दोघांनी चालबाजी करीत केश्वनी यांना उपमा खाऊ घातला. त्या उपम्यामध्ये गुंगीचे औषध आधीच मिक्स केलेले होते. तो उपमा खाताच केश्वनी यांना गुंगी आली. हीच संधी साधत दोघांनी त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी, 35 हजारांची रोकड, मोबाईल आणि त्यांच्या बायबल पुस्तकात ठेवलेले एटीएम कार्ड काढून घेतले. नागोठण्याजवळ एक्प्रेस सिग्नलला थांबताच दोघांनी गाडीतून उडी टाकून पोबारा केला.

केश्वनी यांनी एटीएम कार्डच्या पाऊचमध्ये पिनकोड लिहिलेला होता. इथेच साहिल आणि नीरजचे फावले. त्यांनी नागोठण्याच्या एका एटीएम सेंटरमध्ये केश्वनी यांच्या खात्यात पैसे असल्याचे तपासले आणि त्यांना लॉटरीच लागली. कारण केश्वनी यांच्या खात्यात लाखो रुपये होते. दोघांनी मग दादर इंदौर, उज्जेन येथे मनसोक्त खरेदी केली. यूपीतल्या गावी जाऊन दोघेही मस्त मौजमजा करीत होते. सर्व काही मजेत सुरू असतानाच रेल्वे क्राइम ब्रँचचे उपनिरीक्षक लक्ष्मण काळे व त्यांचे पथक तेथे धडकले आणि सर्वच हातचे गेले. साहिल आणि नीरज दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. एक्प्रेस गाड्य़ांमध्ये किंवा गाडीची वाट बघत थांबलेल्या प्रवाशांना ते हेरतात. सोबत आणलेले बिस्कीट, वडापाव असे खाद्यपदार्थ किंवा शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटतात.
उपम्यामधून गुंगीचे औषध देऊन प्रवाशाला लुटल्याची ही तशी पहिलीच घटना नाही. उन्हाळ्याची सुट्टी पडली आहे. अनेकजण गावी किंवा थंड हवेच्या ठिकाणी जाण्याच्या तयारीत आहेत. तेव्हा अनोळखी व्यक्ती शीतपेय किंवा खाण्यासाठी काही देत असेल आणि ते घेण्यासाठी खूपच आर्जव करत असतील तर सावध व्हा.

आपली प्रतिक्रिया द्या