नगरसेवकांना अपात्र ठरवण्याच्या मागणीवर ८ आठवड्यात निकाल लागणार

29

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

कोपरगाव नगरपरिषदे मधील १३ नगरसेवकांविरूद्ध अपात्रतेच्या प्रस्तावावर आठ आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठाने दिले आहेत.  कोपरगाव न. प मध्ये २९ नगरसेवक असून १३ विरूद्ध विविध कारणांसाठी अपात्रतेचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यामध्ये सभागृहातच गुटखा खाऊन थुंकणे, अनधिकृत बांधकामे करणारे, अधिकाऱ्यांबरोबर गैरवर्तन अशा वेगवेगळ्या कारणांचा समावेश आहे.

नगरसेवक राजेंद्र सोनवणे हे सभागृहामध्ये तंबाखू, गुटखा खाऊन येतात आणि सतत थुंकत असतात अशी तक्रार करण्यात आली आहे. नगरसेवक राजेंद्र झावरे, कृष्णा आवाड, सपना मोरे, उज्वला रणशूर, वैशाली आडाव, सिंधुताई सिंगाडे यांनी कोपरगावच्या मुख्याधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन केल्याने त्यांच्या अपात्रतेसाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. नयनकुमार वाणींवर वीजचोरीचा आरोप आहे, तर इतर नगरसेवकांवर अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणाला पाठबळ दिल्याचा आरोप आहे. या आरोपांमुळे या नगरसेवकांविरोधात अपात्रतेचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

सामाजित कार्यकर्ते संजय काळे यांनी न्यायालयात जाण्यापूर्वी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव ठेवला होता, मात्र त्यावर त्यांनी काहीच निर्णय न घेतल्याने काळेंनी खंडपीठात याचिका दाखल केली. खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे यांनी राज्य शासनाने आठ आठवड्यात याबाबतचा अंतिम निर्णय घ्यावा असे आदेश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या