16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकर घ्या! शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट

16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्दय़ावर लवकरात लवकर सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने राहुल नार्वेकर यांची विधान भवनातील त्यांच्या दालनात भेट घेतली. 16 आमदारांच्या अपात्रतेचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निवेदन त्यांना यावेळी शिष्टमंडळाने दिले.

सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीत जे प्रकरण सोपवलं आहे त्याबाबत लवकरात लवकर सुनावणी होईल, अशी आम्हाला खात्री असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या भेटीनंतर दिली. अध्यक्षांसोबत यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या शिष्टमंडळात अंबादास दानवे यांच्यासह आमदार ऍड. अनिल परब, पक्षाचे विधानसभेतील गटनेते अजय चौधरी, आमदार विलास पोतनीस, रवींद्र वायकर, रमेश कोरगावकर यांचा समावेश होता.

राहुल नार्वेकर हे आता राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सल्ला घेणार आहेत. त्यानंतर ते पुढील कार्यवाही सुरू करणार आहेत. राज्याचे महाधिवक्ता सराफ सध्या देशाबाहेर आहेत. विधानसभा सदस्य अपात्र प्रकरणाच्या पाच याचिका नार्वेकर यांच्यासमोर प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयाने वाजवी वेळेत निर्णय घेण्याचे निर्देश त्यांना दिलेले आहेत. मात्र याचिकातील वादी-प्रतिवादी यांना नियमाप्रमाणे नोटिसासुद्धा अजून पाठवल्या गेल्या नाहीत, अशी माहिती विधिमंडळातील सूत्रांनी दिली.