‘मेट्रो’च्या कामासाठी पालिकेची परवानगी घ्यावीच लागणार!

31

सामना ऑनलाईन । मुंबई

‘मेट्रो’च्या कामासाठी पालिकेच्या परवानगीची अट रद्द करणारा प्रस्ताव आज सुधार समितीत फेटाळण्यात आला. ‘मेट्रो’च्या कामामुळे मुंबईकरांना आधीच मनःस्ताप सहन करावा लागत असताना आणखी मनमानी चालू देणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतल्यामुळे हा प्रस्ताव बहुमताने नाकारण्यात आला. यामुळे यापुढेही ‘मेट्रो’च्या कामासाठी पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.

रेल्वे, विमान प्राधिकरण या केंद्र सरकारच्या आस्थापनांप्रमाणे ‘मेट्रो’ला पालिकेची परवानगी न घेता काम करता यावे असा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास खात्याकडून पालिकेला पाठवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सुधार समितीत प्रशासनाकडून हा प्रस्ताव याआधीही मांडण्यात आला होता, मात्र शिवसेनेने याला पहिल्यापासूनच जोरदार विरोध केला आहे. हा प्रस्ताव आज सुधार समितीत पुन्हा मांडण्यात आला असता शिवसेनेच्या ठाम भूमिकेनंतर बहुमताने फेटाळण्यात आला.

‘मेट्रो’ची मनमानी खपवून घेणार नाही
‘मेट्रो’च्या कामामुळे मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ‘मेट्रो’च्या कामामुळे जुन्या पाइपलाइन फुटत आहेत. याचा भुर्दंड पालिकेला पडत आहे. रस्त्यांची दुरवस्था झाली असून वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. शिवाय दिवसरात्र सुरू असलेल्या कामामुळे मुंबईकरांना कर्णकर्कश आवाजाचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा प्रकारे मुंबईकरांच्या जीवनाशी थेट संबंध येणाऱया ‘मेट्रो’ला पालिकेच्या परवानगी अनिवार्यच आहे. अन्यथा ‘मेट्रो’ची मनमानी आणखी वाढेल. मात्र शिवसेना मुंबईकरांच्या हितासाठी ‘मेट्रो’ची मनमानी खपवून घेणार नाही असा इशारा सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर यांनी दिला.

आपली प्रतिक्रिया द्या