पोईसर, दहिसर नद्यांच्या प्रदूषण नियंत्रणासाठी जलद उपाययोजना करा!

402

मुंबई शहरातून वाहणाऱया पोईसर आणि दहिसर नद्या प्रदूषित झाल्या आहेत. हे प्रदूषण आवाक्यात आणण्यासाठी जलदगतीने आवश्यक त्या उपाययोजना करा, असे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी प्रशासनाला दिले.

मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली. पोईसर व दहिसर नदी सुशोभीकरण व पुनर्जीवित करणे. त्यासोबत उपनगरातील डीपी रोड आणि मिसिंग लिंक रोड संदर्भात या वेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली. बैठकीत नदी परिसरातील 20 तबेल्यांच्या प्रश्नाकर चर्चा झाली. पोईसर आणि दहिसर नद्यांचे प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रश्न तातडीने सुटणे आवश्यक असून यावर जलद कार्यवाही व्हावी, असे निर्देश पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी या वेळी दिले.

उपनगरातील वाहतूककोंडी कमी होण्यासाठी दिंडोशी ते कांदिवली-लोखंडवाला, वर्सोवा आदर्श नगर ते मालाड, आरे कॉलनी या रस्त्यांच्या कामांना गती देणे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात इलेक्ट्रिक कार सुरू करणे, पार्किंग सुरू करणे आदी विषयांवरही चर्चा झाली. याबाबत संबंधित विभागाबरोबर तातडीने बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचा सकारात्मक प्रयत्न केला जाईल, असे पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी सांगितले. या वेळी नगरसेविका शीतल म्हात्रे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. केलरासू, रिव्हर मार्च मुव्हमेंटचे प्रतिनिधी गोपाल जव्हेरी, तेजस शाह, पंकज त्रिवेदी, राजेश जैन आदी उपस्थित होते.

मुंबईतील झाडांचे गुगल मॅपिंग करण्याची सूचना

दहिसर नदीला जिवंत करण्यासाठी गुजरातच्या साबरमती नदीच्या धर्तीवर पर्यटनाच्या दृष्टीने या नदीचे सुशोभीकरण करण्यात यावे. दहिसर नदीच्या कडेला रिव्हर फेस्टिव्हलचे आयोजन करावे. तसेच मुंबईतील झाडांचे गुगल मॅपिंग करण्यात यावे, अशा सूचना रिव्हर मार्चच्या पदाधिकाऱयांकडून या बैठकीदरम्यान करण्यात आल्या.

आपली प्रतिक्रिया द्या