कथित गोरक्षकांविरोधात कठोर कारवाई करा, पंतप्रधानांचा आदेश

14

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गोरक्षणाच्या नावाखाली देशभर सुरू असलेला हिंसाचार आणि हैदोसाविरोधात कठोर कारवाई करण्याचा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींनी हे वक्तव्य केले आहे. अधिवेशनामध्ये विरोधकांकडून कथित गोरक्षकांचा मुद्दा उचलल जाण्याची शक्यता असल्याने मोदींनी हे वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे.

कायदा हातात घेणाऱ्या स्वयंघोषित गोरक्षकांविरोधात कारवाई करण्याच्या सुचना पंतप्रधान मोदींनी दिल्या आहेत. ‘कोणत्याही व्यक्तिला कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही, कायदा हातात घेणाऱ्या गोरक्षकांविरोधात कठोर कारवाई करा अशा सुचना पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांना दिल्या आहेत’, असे केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी सांगितले.

देशात गाईच्या संरक्षणाच्या नावाखाली अनेकांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात काहींचा मृत्यूही झाला आहे. भाजप सरकार असलेल्या राज्यांमध्ये गोरक्षकांनी कायदा हातात घेत गोमांसाच्या संशयावरून सर्वाधिक हत्या केल्या आहेत. मात्र गाईंच्या संरक्षणासाठी कायदा हातात घेऊन हिंसाचार करणे सहन केले जाणार नाही,’ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटल्याचे अनंत कुमार यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या