माजी सैनिकांची मागणी, सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणाऱ्या परिचारकांना बडतर्फ करा

30

सामना ऑनलाईन, चिपळूण

देशासाठी बलिदान देणाऱ्या, सीमेवर सतत जागता पहारा देणाऱ्या जवानांच्या पत्नींच्या चारित्र्याबाबत अपमानकारक विधान करणाऱ्या भाजपचे विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक यांच्या विरोधात देशात प्रक्षोभक निषेध व्यक्त होत असून परिचारक यांच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी याकरिता निषेध मोर्चे निघत आहेत. चिपळूण तालुक्यातही माजी सैनिक संघाच्या वतीने आज निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्यात चिपळूणवासी नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

भाजपचा विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक याने पंढरपूर येथील एका सभेत वीर जवानांच्या पत्नीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून देशातील सर्व वीर जवानांच्या पत्नींचा अपमान करणारे विधान केल्याने देशात संतापाची लता उठली आहे. या पार्श्वभूमीवर येथील चिपळूण तालुका माजी सैनिक संघाच्या वतीने निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला. बहादूर शेख नाका ते प्रांत कार्यालयादरम्यान निघालेल्या मोर्च्यात भाजप व परिचारक यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या तर परिचारक यासारख्या विकृत व महिलांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीने देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांचा अपमान करून देशद्रोह केला आहे. अशा देशद्रोही विकृताला कठोर शासन करण्याऐवजी दीड वर्षाकरिता निलंबन करून त्याला पाठीशी घातले आहे.

परिचारकसारख्या विकृत व्यक्तीला केवळ निलंबन करणे ही शिक्षा नसून त्याला पाठीशी घालणाऱ्या राज्य सरकारचा निषेध व्यक्त करीत माजी सैनिक संघटनेने परिचारक यांचे कायमस्वरूपी निलंबन करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. सदर मागणीचे पत्र संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी कल्पना भोसले जगताप यांना दिले. यावेळी प्रकाश सावंत आदींसह माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, माजी सैनिक व चिपळूणमधील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

आपली प्रतिक्रिया द्या