रंगीबिरंगी होळी साजरी करताना घ्यावयाची काळजी

>> डॉ. अप्रतिम गोएल, सौंदर्यतज्ञ

होळी…रंगांचा सण…रंग उधळून साजरा केला जातो. पूर्वी तो नैसर्गिक रंगांनी साजरा व्हायचा. मात्र आता रसायनयुक्त धुळवड साजरी केली जाते. यामध्ये रासायनिक पदार्थ, ऑक्सिडाईज्ड धातू, वंगण काजळी किंवा कधी कधी काचही असू शकते. हे त्वचेला अतिशय घातक ठरू शकते. यातूनच ऍलर्जी, त्वचेला इजा, केस कोरडे पडणे, डोळ्यांना दुखापत होऊ शकते. यासाठी नैसर्गिक रंगांनी होळी खेळून स्वतःबरोबर इतरांनाही आनंद द्या. शिवाय रंग खेळण्यापूर्वी केस, त्वचा आणि डोळ्यांची काळजी घ्या. जेणेकरून सुरक्षित रंगपंचमी साजरी करू शकाल.

डोळ्यांसाठी

कोरडे रंग डोळ्यांत गेले तर सगळ्यात आधी डोळे पाण्याने धुवा. पूर्ण रंग निघून जाईपर्यंत डोळे स्वच्छ धुवा. यासाठी गरम किंवा थंड पाणी न वापरता साधे पाणी वापरा. कारण अधिक थंड किंवा गरम पाण्यामुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो. रंग डोळ्यांत गेल्यानंतर डोळे चोळले जातात. यामुळे डोळ्यांतून पाणी येते. जास्त त्रास होतो. त्यामुळे डोळे चोळू नका. डोळे स्वच्छ धुतल्यानंतर त्यात मॉइश्चराइजिंग आयड्रॉप्स घाला. त्यामुळे डोळ्यांचा त्रास कमी होऊन आराम मिळेल.

रंग खेळल्यानंतर

 • रंग लावल्यानंतर त्वचेला खाज किंवा कोणताही त्रास होऊ लागल्यास त्वचेचा तो भाग पाण्याने धुवा व त्यावर मॉइश्चरायझर लावा. जर त्वचा लाल झाली किंवा त्वचेला खाज येऊ लागल्यास शक्य तितक्या लवकर डॉक्टरांची भेट घ्या.
 • हातापायांच्या नखांना लिंबाचा रस चोळा. त्यामुळे रंग लवकर निघायला मदत होईल.
 • सोयाबीन पीठ आणि बेसन दुधात मिसळून चेहऱ्याला क्रब करावे. मात्र रंग निघण्यासाठी त्वचा जोराने चोळू नये. नंतर चेहरा धुवावा.
 • ऍरोमा ऑईल त्वचेवर लावावे. हे तेल रंगामुळे त्वचेवर आलेल्या ऍण्टीफंगल आणि ऍण्टीबॅक्टेरियल आहे.
 • केस फारच कोरडे झाले असतील तर दुसऱ्या दिवशी त्यांना तेल हलकेसे गरम करून लावावे. गरम पाण्यात टॉवेल
 • बुडवून तो पिळून त्याने केसांना शेक द्यावा. नंतर हलक्या (माईल्ड) शॅम्पूने केस धुवावेत.
 • ब्लिचिंग, वॅक्सिंग, फेशियल होळी खेळल्यानंतर आठवडाभर कटाक्षाने टाळावे.

रंग खेळताना घ्यायची काळजी

 • शक्यतो घरी तयार केलेले नैसर्गिक, आयुर्वेदिक रंग वापरा. हीना, हळद, गुलाबाच्या किंवा फुलांच्या सुकलेल्या पाकळ्या, चहा पाने यापासून रंग बनवा. यामध्ये गुलाल मिसळल्यास त्वचेला हानी पोहोचणार नाही.
 • मोहरीचे तेल, खोबरेल तेल, ऑलिव्ह तेल किंवा जमल्यास व्हॅसलिन त्वचेला लावून होळी खेळावी. यामुळे त्वचेवरील रंग लवकर धुऊन निघण्यास मदत होते. तसेच शक्यतो संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे परिधान करून होळी खेळावी.
 • धुळवड खेळून घरी परतल्यावर भरपूर पाणी प्यावे. रंग उधळीत चुकून शरीरात गेलेल्या रासायनिक पदार्थांची बाधा शरीराला होणार नाही.
 • शरीरावरील गुलाल साफ करण्यासाठी पाण्याचा वापर करू नका. कारण पाण्यामुळे गुलाल पसरतो. कोरडे हात किंवा कापडाने गुलाल साफ करावा.
 • त्वचेवरील रंग साफ करताना त्वचा रगडू नये. साबणाऐवजी शक्यतो फेसवॉशचा वापर करावा.
 •  पाठीमागे, नाक, पाय, कोपर इथेही क्रीम लावा. रंगामुळे त्वचेवर परिणाम झाल्याचे जाणवल्यास त्वचेचा भाग थंड पाण्याने धुऊन काढावा किंवा गरज असल्यास कॅलामाइन लोशन लावावे.
 • मुलींचे केस लांब असतात. त्यामुळे ते संपूर्ण झाकूनच रंग खेळावा. केसांना खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह लावावे. खेळून आल्यानंतर केस कंडिशनरने धुवावे.
 • खेळून आल्यानंतर केस सौम्य शॅम्पू, लेमन ज्यूसनेच धुवावेत.
 • ओठांची काळजी घेण्यासाठी लीप ग्लॉस किंवा लीप बामचा वापर करा.
 • हाताच्या आणि पायांच्या नखांची काळजी घेण्यासाठी होळी खेळायला जाण्यापूर्वी पारदर्शक किंवा लाल रंगाचं नेलपॉलिश लावा.
 • होळी खेळायला जाण्यापूर्वी त्वचेला टोनर लावा, जेणेकरून तुमच्या त्वचेची छिद्रे झाकली जातील.
 •  होळी खेळताना किंवा खेळून झाल्यावर उन्हात बसू नका. त्यामुळे रंग काढण्यास त्रास होतो तसेच त्वचेची हानीही होते.
 • कॉण्टॅक्ट लेन्स लावून रंग खेळू नका.
आपली प्रतिक्रिया द्या