तामीळनाडूतील टकटक गँग गजाआड, पोलिसांनी घेतली तामीळ भाषांतरकाराची मदत

515

रस्त्यात पार्क केलेल्या गाडीतून वस्तू चोरणाऱ्या टकटक गँगच्या दोघांना बोरिवली पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. अरुण तेवर आणि शरणकुमार तेवर अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या अटकेमुळे बोरिवली पोलिसांनी तीन गुह्यांची उकल केली.

बोरिवलीत  एका गाडीची काच फोडून त्यातून वस्तू चोरीला गेल्याप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पोलीस उपायुक्त डॉ. मोहनकुमार दहीकर यांनी आरोपीच्या अटकेचे आदेश पोलिसांना दिले. वरिष्ठ निरीक्षक लक्ष्मण डुंबरे यांच्या पथकातील उपनिरीक्षक योगेश पाटील, नीलेश मोरे यांनी तपास सुरू केला.  तपासदरम्यान सोमवारी बोरिवली पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई मेहेर आणि गाढवे हे एस. व्ही. रोड येथे गस्त घालत असताना एका रिक्षामध्ये दोन जण संशयास्पदरीत्या बसल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांना पाहताच शरणकुमार पळू लागला. पोलिसांनी काही अंतर पाठलाग करून शरणकुमारच्या मुसक्या आवळल्या. त्या दोघांना तामीळ भाषा येत होती. परिणामी पोलिसांनी तामीळ भाषांतरकाराची मदत घेतली. चौकशीत त्या दोघांनी चोरीची कबुली दिली.  न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.  हे दोघे मूळचे तामीळनाडूचे असून 10 दिवसांपूर्वी मुंबईत आले होते.

अशी करतात फसवणूक 

रस्त्यात पार्क गेलेल्या ज्या गाडीत ड्रायव्हर असेल त्याला ही टोळी टार्गेट करते. टोळीतील एक जण दहा रुपयाची नोट गाडीच्या पुढच्या चाकाजवळ टाकतो. त्यानंतर दुसरा जण हा ड्रायव्हरला नोट पडल्याचे सांगतो. ड्रायव्हर नोट उचलण्यासाठी बाहेर पडताच या टोळीतील एक जण पुढच्या किंवा मागच्या सीटवर ठेवलेले साहित्य घेऊन पळ काढतो.

आपली प्रतिक्रिया द्या