परीक्षार्थी तरुणीसह तिघांवर गुन्हा; वॉकीटॉकीसह स्पाय हेडफोन, टॅब, छुप्या कॅमेऱ्याचा वापर
शहरातील एका केंद्रावर गुरुवारी सकाळी तलाठी पदाच्या ऑनलाईन परीक्षेवेळी पेपर फुटल्याने खळबळ उडाली. या केंद्रातील एका परीक्षार्थीला बाहेरून वॉकीटॉकीच्या मदतीने कॉपी पुरवणाऱया तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्याच्यासह परीक्षार्थी तरुणी व एका साथीदाराविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे राज्यातील मोठे रॅकेट समोर येण्याची चिन्हे आहेत.
दिंडोरी रोडवरील वेब इन्फोटेक सोल्यूशन या केंद्रावर सकाळी नऊ वाजता तलाठी पदाची दोन तासांची ऑनलाईन परीक्षा सुरू झाली. दरम्यान, दहा वाजेच्या सुमारास केंद्राबाहेरच्या परिसरात एकजण संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. म्हसरूळ पोलिसांनी त्याला हटकले. छत्रपती संभाजीनगरच्या संजारपूरवाडी येथील गणेश शामसिंग गुसिंगे (28) असे त्याचे नाव आहे. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ दोन मोबाईल, टॅब, वॉकीटॉकी व कानात लावण्याचे स्पाय हेडफोन बड्स मिळून आले. त्याचबरोबर मोबाईलमध्ये केंद्रावर सुरू असलेल्या ऑनलाईन परीक्षेतील संगणकावरील प्रश्नांचा फोटो आढळला. त्यावरील आसन क्रमांकावरून परीक्षार्थीचा छडा लागला. तो वॉकीटॉकीच्या मदतीने परीक्षार्थीला उत्तरे सांगत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
म्हसरूळ पोलीस ठाण्यात हवालदार देवराम चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गणेशसह संबंधित तरुणी व साथीदार सचिन नायमाने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गणेशला अटक करण्यात आली असून, इतर दोघे फरार आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर यांनी दिली.
बहाद्दरांची हायटेक कॉपी
या बहाद्दरांनी हायटेक पद्धतीने कॉपी केली. परीक्षार्थीकडे छुपा कॅमेरा होता. तिने त्याद्वारे फोटो काढून ब्ल्यूटूथच्या मदतीने बाहेरील साथीदारांना तो पाठवला. टॅब, वॉकीटॉकी, दोन मोबाईल, स्पाय हेडफोन घेऊन परीक्षा केंद्राजवळ थांबून असलेल्या गणेशने तिला वॉकीटॉकीद्वारे उत्तरे सांगितल्याचे समोर आले आहे.
रॅकेटचा पर्दाफाश होणार
गणेश गुसिंगे याच्याविरुद्ध यापूर्वी राज्यात दोन ठिकाणी पोलीस भरती व म्हाडाच्या ऑनलाईन परीक्षेत ऑनलाईन कॉपी पुरवल्याचे गुन्हे दाखल आहेत. यामुळे रॅकेटचा पर्दाफाश होणार आहे. यात आणखी कोण सहभागी आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.