केस, दाढी कापून घ्याल तर खबरदार! तालिबानच्या फतव्याने अफगाणी सलून चालकांचा धंदा गोत्यात

अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारने आपले जुलमी रंग दाखवायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून महिलांवरील जाचक बंधनांनंतर आता तालिबानने केस कापणे आणि दाढी करण्याचे  प्रकार तर मुळीच खपवून घेतले जाणार नाही असा कट्टरपंथी फतवा अफगाणिस्तानच्या हेलमंद प्रांतात काढल्याचे वृत्त आहे. अफगाणी वर्तमानपात्र फ्रंटियर मेलच्या वृत्तानुसार सलून चालकांवरही अनेक बंधने घालत केश कर्तनाच्या व्यवसायावरही गदा आणली आहे.

इस्लामिक परंपरा मंत्रालयाच्या अधिकाऱयांनी  अफगाणिस्तानच्या हेलमंद प्रांताची राजधानी लश्करगाह शहरात अनेक पुरुष सलूनच्या चालकांची भेट घेतली. या भेटीत केस कापण्यावर आणि दाढी करण्यावर प्रतिबंध असल्याचे इस्लामी परंपरांचा दाखला देत या अधिकाऱयांनी बजावले. नियम न पाळणाऱया सलूनचालकांची खैर नाही, असा सज्जड दमही या तालिबानी अधिकाऱयांनी केश कर्तनालय चालकांना दिला आहे.

 सलूनमध्ये गाना बजानामुळीच नको

पुरुषांच्या सलून्स आणि त्याच्या आसपासच्या परिसरात संगीत, गाणे वाजवणे मुळीच खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगत तालिबानी अधिकाऱयांनी 20 वर्षांपूर्वीची तालिबानी राजवट पुन्हा सक्रिय झाल्याचे उघड केले. सोशल मीडियावरून तालिबानचा जुलमी आणि धर्मांध आदेश अफगाणी नागरिकांपर्यंत पोचवला जात आहे. 1996 ते 2001 या काळातील  तालिबानी  राजवटीतील शरिया कायदा काटेकोरपणे अमलात आणण्याचे तालिबान सरकारने ठरवले आहे. त्यानुसार अनेक जुलमी तालिबानी कायदे अफगाणी नागरिकांवर लादले जात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या