गुजरातमध्ये उभारणार जगातील सर्वांत उंच मंदिर, एक हजार कोटींचा येणार खर्च

1588

गुजरातमध्ये जगातील सर्वात उंच पुतळा उभारल्यानंतर आता अहमदाबाद येथे जगातील सर्वात उंच मंदिर उभारण्यात येणार आहे. हे मंदिर गुजरातमधील पाटीदार समाजाच्या उमिया देवीचे असून त्यासाठी तब्बल एक हजार कोटींचा खर्च येणार असल्याचे समजते. या मंदिराचा पाया भरणी सोहळा आज पार पडणार असून त्यासाठी देशभरातील 21 साधूसंत उपस्थित राहणार आहेत. तसेच दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याला तब्बल 2 लाख भाविक भेट देतील असे समजते.

हे मंदिर 131 मीटर उंच (431 फूट) असणार असून ते 100 बिघा परिसरात पसरलेले असेल. या मंदिरात उमिया देवीची 52 फूटाची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. उमिया देवी व्यतिरिक्त इतर देवांचीही मंदिर या परिसरात असतील. यात पाऱ्यापासून तयार केलेल्या शिवलिंगाचे देखील मंदिर असणार आहे. या मंदिराला 83 मीटर, 90 मीटर व 110 मीटरवर व्ह्युईंग गॅलरी असणार आहेत. त्यातून पर्यटकांना अहमदाबाद शहराचे दर्शन होईल.

या मंदिराचे मॉडेल हिंदुस्थानी व जर्मनीच्या आर्किटेक्टने डिझाईन केले आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी तब्बल 1000 कोटींचा खर्च येणे अपेक्षित आहे. यासाठी सध्या विश्व उमिया फाऊंडेशनकडून आतापर्यंत 375 कोटींचा फंड जमा करण्यात आला आहे. तर उर्वरित रक्कम ही येत्या पाच वर्षात मंदिर पूर्ण होईपर्यंत जमा केली जाईल, असे सांगण्यात येते. मंदिर उभारणीचे काम 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. या मंदिराच्या परिसरात स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी, करिअर डेव्हलपमेंट सेंटर, रुग्णालय, स्पोर्ट्स फॅसिलिटी सेंटर, एनआयआय भवन, रोजगार माहिती केंद्र देखील असणार आहेत.

गुजरातमधील नर्मदा नदी पात्रात  सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. हा पुतळा 182 मीटर (597 फूट) उंच आहे. या पुतळ्याचे गेल्यावर्षी 31 ऑक्टोबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. टाइम्स मॅगझीनने 2019 मधील 100 महान ठिकाणांमध्ये ‘स्टॅच्यू ऑफ यूनिटी’चा समावेश केला आहे. या पुतळ्याला दररोज शेकडो पर्यटक भेट देतात.

आपली प्रतिक्रिया द्या