रंगतदार बाता…

359

डॉ. गणेश चंदनशिवे, [email protected]

बतावणी तमाशाचे रंगतदार अंग… पाहूया या बातांमध्ये काय असते…

लोकनाटय़-तमाशामध्ये बतावणी या घटकाला महत्त्वाचे स्थान आहे. बतावणी म्हणजे बाता मारणे. गण, गौळण झाल्यानंतर बतावणी रंगबाजीला सुरुवात होते. या घटकात प्रामुख्याने सोंगाडय़ा व त्याचा साथीदार तसेच नायकीन व तिचे साथीदार भूमिका साकारताना दिसतात. रंगबाजीचे स्वरूप प्रहसनात्मक असते. यात लहानशा कथानकात कल्पनेने संवाद योजून रंग भरला जातो. यात स्थळ, काळ आणि वेळेचा आभास निर्माण केला जातो. बतावणीचे संवाद हे द्वीअर्थी असतात. बतावणीच्या कथानकातील नेपथ्य हे शब्दसामर्थ्यावर उभे केलेले असते. तसे पाहता बतावणी हा शब्द लोकाचारातून आलेला असून तो लोकभाषेची वैशिष्टय़े सांगणारा आहे. एखादय़ाला ठगवण्यासाठी किंवा बनवण्यासाठी रचलेले सोंग म्हणजेच बतावणी असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बतावणी तमाशा कलेत लोकनाटय़ाचा आत्मा असल्याने त्यातून लोकांचे निखळ मनोरंजन होते.

बतावणीस ग्रामीण भाषेत सबादनी तर वाङ्मय भाषेत संपादनी असे म्हणतात. तमाशातील सोंगाडय़ा हा उत्स्फूर्तपणे अभिनय करत चालू वर्तमानकाळातील संदर्भ जोडून लोकांना हसवता-हसवता चिमटे देखील काढतो. खऱयाचे खोटे आणि खोटय़ाचे खरे करून तेही रेटून दाखवणे हे बतावणीचे गुणवैशिष्टय़ आहे. आंगिक हालचाली, वात्रट विनोद, शाब्दिक कोटय़ा या बतावणीमध्ये ओतपोत भरलेल्या असतात. महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये हाच केवळ पुरुषांनी पाहण्याचा कलाप्रकार असल्यामुळे त्यातील विनोद सामाजिक संकेत झुगारून थोडासा अश्लीलतेकडे झुकणारा आहे असे असूनसुद्धा सामाजिक दुर्गुणावर मार्मिक भाष्य करत विनोदी शैलीने समाजाचे मनोरंजनाबरोबर उद्बोधन केले जाते.

बतावणीचे जनकत्व हे शाहीर परशुरामाचा शिष्य भवानी तेली यांच्याकडे जाते. भवानी तेल्यानी बडोदे दरबारी इ.स. १८४४ साली मराठी तमाशा तोडमोडक्या गुजराती भाषेतून सादर करण्याचा प्रयत्न केला. मराठी शब्दाचा गुजराती अर्थ हा भलताच निघत असल्यामुळे लोकांमध्ये चांगलाच हशा पिकला. आणि भवानी तेल्याचा तमाशा हा भरभराटीस आला. बडोदे सरकारामधील राणी साहेबांनी भवानी तेल्याच्या हजरजबाबीवरून खूश होऊन त्याला ‘बाकेलाल’ ही पदवी बहाल केली. पुढे बतावणी रंगबाजीचा उत्कर्ष होऊन भाऊबापू मांग नारायणगावकर यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर बतावणी अधिक विकसित केली व तमाशा रंगभूमीला एक महत्त्वाचा घटक मिळाला.

आज रंगबाजी तमाशातील अविभाज्य अंग होऊन बसली आहे. बतावणीत अतिशोयोक्तीचा पुरेपूर वापर केलेला असतो. तात्या-बापू, आबूराव-बाबूराव अशा प्रकारची पात्र विकसित करून सोंगाडय़ांनी बतावणी विकसित केली. दगडूशाळू शिरोळीकर, दादू इंदूरीकर, काळू-बाळू, दत्ता महाडिक, गुलाबराव बोरगावकर, वसंत अवसरीकर, रघुवीर खेडकर, प्रकाश इनामदार या आणि अशा कित्येक तमाशा कलावंतांनी बतावणी समृद्ध केली. सामाजिक, राजकीय, रजवाडी, कथानक घेऊन मौखिक पद्धतीने उत्स्फूर्तपणे त्याला फुलवत नेण्याची खुबी या कलावंतांकडे असल्याने बतावणीला आधुनिक काळात तमाशा रंगभूमीवर महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या