तमाशा आज आणि काल

प्रातिनिधिक फोटो

डॉ. अनील चंदनशिवे, [email protected]

आजच्या काळात मागणीनुसार तमाशातही ऑर्केस्ट्रा शिरला असला तरी ही लोककला मूळची विधीनाट्य, भक्तिनाटय़ आणि लोकनाट्य यावर आधारलेली आहे…

महाराष्ट्राला पारंपरिक लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. विधिनाटय़, भक्तिनाटय़ आणि लोकनाटय़ या त्रिसूत्रीच्या खांद्यावर लोककलेची पारंपरिक धुरा आधारलेली आहे. ग्रामजनाच्या निखळ रंजनासाठी सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात तमाशा कला उदयाला आली.

त्या काळात तमाशाचे स्वरूप ओबडधोबड होते. उमा मांग- सावळजकर आणि हैबती घाडगे-पुसेसावळीकर यांच्या रूपाने आधुनिक तमाशा वगनाटय़ाची मांडणी उदयाला आली. मोहनाबरावसारखे वगनाटय़ तमाशाच्या मांडणीत भरीब काम करू लागले. या काळात तमाशा पूर्ण रूपास गेला असे म्हणावे लागेल. तमाशा, गण, गौळण, बनावणी, रंगबाजी, लावणी, फार्स आणि वगनाटय़ हे घटक आले. पूर्वरंग आणि उत्तर रंगात तमाशा विभागला गेला. प्रदेशपरत्वे तमाशाला त्या त्या भूभागानुसार नामविधाने मिळाली.

पश्चिम महाराष्ट्रात ढोलकी फडाचा तमाशा तर उत्तर महाराष्ट्रात (खान्देश) खान्देशी तमाशा, विदर्भात खडीगंमत किंवा खेळ गमतीचा तमाशा तर मराठवाडय़ात बालेघाटी तमाशा अशा प्रकारची रूपे तमाशाने धारण केली. त्यातून तमाशा परंपरेचे दोन प्रकार विकसित झाले. एक म्हणजे तंबू कनादीचा तमाशा (ढोलकी फडाचा) आणि दुसरा म्हणजेच संगीत बारीचा तमाशा होय.

ढोलकी फडाचा तमाशा ४० ते ५० कलावंतांच्या संचासहित महाराष्ट्रातील गावोगावी यात्रा-जत्रा, आठवडेबाजाराच्या निमित्ताने सादर होतो तर संगीत बारीचा तमाशा लावणी कलाकेंद्राच्या नावाने, बंदिस्त चार भिंतींत मोजक्या प्रेक्षकांसमोर वर्षाच्या बाराही महिने चालू असतो. मात्र ढोलकी फडाच्या तमाशाचा प्रारंभ पाडवा सणाचे नवीन वर्षाचे औचित्य साधून होतो. सुगीचे दिवस संपले की शेतावर काम करणाऱया शेतकऱयाच्या हातात पै-पैसा येतो तेव्हा सुपारी देऊन तमाशा कलावंतांचे फड मानसन्मानाने यात्रे-जत्रेनिमित्ताने निमंत्रित केले जातात.

पूर्वीच्या काळी तमाशातून आध्यात्मिक, पौराणिक, ऐतिहासिक वगनाटय़े सादर होत असायची. कलगी-तुऱयाच्या फैरी झडायच्या. सवाल- जवाबामधून भेदीक सांगितल्या जायच्या. त्यातून लोकांचे मनोरंजनाबरोबर प्रबोधन आणि उद्मोदन व्हायचे. या उद्मोदनाबरोबरच लोकांना लोकशिक्षणसुद्धा मिळायचे. आज दूरचित्रवाहिन्यांमुळे आणि चित्रपटांच्या आक्रमणामुळे पारंपरिक तमाशा आपला मूळ बाज हरवून बसला आहे. तमाशात ऑर्केस्ट्रा घुसला असून सरकारने वेळेवर निर्बंध घातल्यामुळे वगनाटय़े संपुष्टात आली आहेत. तमाशारसिक चित्रपटांच्या गाण्यांची मागणी करत आहेत. कृष्णाचा महिमा सांगणाऱया गौळणी चित्रपटांतील गवळणी गाऊन लोकांचे रंजन करीत आहेत. लोकांनी चित्रपटांची गाणी ऑर्केस्ट्रा किंवा रेकॉर्ड करून ऐकावीत. तमाशातून पारंपरिक गाण्यांची मागणी करावी, जेणेकरून तमाशा, कला आणि कलावंत जगतील.

आपली प्रतिक्रिया द्या