प्रसिद्ध तमिळ अभिनेत्याच्या 16 वर्षीय मुलीची आत्महत्या

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि संगीतकार विजय अँटोनी याच्या 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे.आज पहाटे 3 च्या सुमारास तिने चेन्नईतील अलवरपेट येथील राहत्या घरी गळफास घेतला.  या घटनेने अभिनेत्याच्या कुटुंबियाला प्रचंड धक्का बसला आहे. या वृत्ताने सिनेसृष्टीतही खळबळ उडाली आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, विजय अँटोनी यांची मुलगी मीरा चेन्नईतील त्यांच्या घरात पहाटे 3 वाजता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. ती 16 वर्षांची होती आणि चेन्नईतील एका प्रसिद्ध शाळेत शिकत होती. मीडिया वृत्तानुसार, विजयची मुलगी डिप्रेशनने त्रस्त होती आणि तिच्यावर उपचारही सुरू होते. घरच्या मदतनीसाने मीराला तिच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत पाहिले. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. सध्या पोलीस अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत. याबाबत विजय आणि त्यांच्या कुटुंबीयांकडूनअद्याप कोणतेही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

विजय अँटनी हा एक प्रसिद्ध तमिळ संगीतकार आहे. अनेक वर्षे संगीतकार राहिल्यानंतर त्याने निर्माता, अभिनेता, गीतकार, संपादक, ऑडिओ अभियंता आणि दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. त्यांनी फातिमा विजय अँटोनीशी लग्न केले. त्यांना मीरा आणि लारा या दोन मुली आहेत. संगीतकार विजय अँटनी सध्या  त्याचा आगामी सिनेमा ‘रथम’ च्या प्रदर्शनात व्यस्त आहे.