ग्राहकाला हिंदी येत नसल्याने कर्ज नाकारले, व्यवस्थापकाची बदली केली

तमिळनाडूतील अरियालूर भागात असलेल्या इंडीयन ओव्हरसीज बँकेच्या व्यवस्थापकाची बदली करण्यात आली आहे. कर्ज मागण्यासाठी आलेल्या ग्राहकाला हिंदी येत नसल्याने व्यवस्थापकाने त्याला कर्ज देण्यास नकार दिला होता असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. विशाल नारायण कांबळे असे व्यवस्थापकाचे नाव आहे. कांबळे हे गंगाईकोंडाचोलपुरम भागात असलेल्या या बँकेचे व्यवस्थापक म्हणून काम पाहात होते. त्यांच्याकडे आलेल्या ग्राहकाने तमीळमध्ये असलेली कागदपत्रे दिली होती. जी खातरजमा करण्यास कांबळे यांनी नकार दिला असा त्यांच्यावर आरोप आहे.

21सप्टेंबरला इंडीयन ओव्हरसीज बँकेने आदेश जारी केला होता, ज्यात म्हटले आहे की विशाल नारायण कांबळे यांची बदली त्रिची इथल्या दुसऱ्या एका शाखेत करण्यात येत आहे. इंडीयन एक्सप्रेस या वर्तमानपत्राने कांबळे यांनी सगळी कागदपत्रे तमीळमध्ये असल्याने त्यांची खातरजमा करण्यास नकार दिल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. सी.बालसुब्रमण्यम ( 76 वर्षे) असे कांबळे यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या ग्राहकाचे नाव आहे.

बालसुब्रमण्यम यांच्याकडे स्वत:ची जमीन आहे.त्यावर त्यांना एक व्यावसायिक संकुल उभे करायचे आहे. यासाठी त्यांना पैशांची गरज होती, जी पूर्ण करण्यासाठी त्यांनी कर्ज काढायचे ठरवले होते. यासाठी त्यांनी गंगाईकोंडाचोलपुरम इथल्या इंडीयन ओव्हरसीज बँकेशी संपर्क साधला होता. त्यांनी विशाल कांबळे यांची कर्जासाठी भेट घेतली होती. कांबळे ही महाराष्ट्रातले आहेत. त्यामुळे त्यांनी सुब्रमण्यम यांनी हिंदी येतं का असा प्रश्न विचारला. यावर सुब्रमण्यम यांनी आपल्याला तमीळ आणि इंग्रजी या दोनच भाषा येत असल्याचे सांगितले. सुब्रमण्यम यांच्याकडे असलेली कागदपत्रे ही तमीळ भाषेत होती. विशाल यांना तमीळ येत नसल्याने त्यांनी आपण ती तपासू शकत नसल्याचे सांगितले. यावर सुब्रमण्यम आणि त्यांच्यात शाब्दीक चकमक उडाली होती. सुब्रमण्यम यांनी आरोप केला आहे की विशाल यांनी आपला कर्जासाठीचा अर्ज न पाहताच नामंजूर केला.

बालसुब्रमण्यम यांनी यानंतर वकिलांमार्फत विशाल यांना नोटीस धाडली. ज्यात त्यांनी त्यांना झालेल्या मनस्तापाबद्दल 1 लाखांची नुकसान भरपाई मागितली आहे. तमीळ भाषा येत नसल्याने बँकेच्या व्यवस्थापकाने आपल्याला कर्ज नामंजूर केले, ही सेवेतील त्रुटी आहे असं सांगत सुब्रमण्यम यांनी ही नुकसानभरपाई मागितली आहे. नुकसानभरपाई न दिल्यास जिल्हा ग्राहक मंचाकडे जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या