प्रेयसीसोबत झाले भांडण, डॉक्टर तरुणाने 40 लाखांची मर्सिडीज कार जाळली

तामिळनाडूत एक विचित्र घटना घडली आहे. एका डॉक्टरने प्रेयसीसोबत भांडण झाल्याने 40 लाखांची मर्सिडीज कार जाळल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी कांचीपुरम पोलिसांनी गुन्हा दाखल करुन केविनची जामिनावर सुटका केली.

केविन असे 28 वर्षीय तरुणाचे नाव आहे. त्याने गेल्यावर्षी कांचीपूरमच्या खासगी मेडीकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तो एका खासगी रुग्णालयात नोकरीला लागला होता. त्याचे कॉलेजमधल्या मैत्रीणासोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. गुरुवारी तो कांचिपुरम येथे प्रेयसीसोबत लॉंग ड्राईव्हला गेला होता. दोघंही राजपुरम तलावाजवळ थांबून गप्पा मारत होते. दरम्यान दोघांमध्ये काही गोष्टीवरुन शाब्दीक वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. केविन संतापाने उठून गाडीतील पेट्रोल काढून गाडीला आग लावली. प्रेयसीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण त्याने तिचे काहीच ऐकले नाही.

रस्त्यावर जळलेल्या अवस्थेत कार पाहिल्याने लोकांनी पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. घटनास्थळी पोलीस पोहोचून त्यांनी एका तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळाली होती. दरम्यान, कांचीपुरम पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन केविनची जामिनावर सुटका केली.