तानाजी सावंतांचा फोटो गाढवाच्या गळयात बांधुन मराठा समाजाच्या कार्यकर्त्यानी केला निषेध

मराठयांना आरक्षणाची खाज आताच कशी सुचली अशी गरळ ओकणाऱ्या शिंदे सरकारमधील मंत्री तानाजी सावंत यांचा मराठा समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. कळंब शहरात गाढवाच्या गळयात तानाजी सावंतांचा फोटो बांधुन आठवडी बाजारात सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यानी गाढव फेरी काढून सावंत यांचा निषेध केला .

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील सर्वच पक्ष प्रयत्न करत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमधील वादग्रस्त मंत्री तानाजी सावंत यांनी मराठ्यांना ‘आरक्षणाची खाज’ शिंदे सरकार आल्यावरच सुटली आहे, असे अत्यंत आक्षेपार्ह व बेजबाबदार विधान केले आहे. तानाजी सावंत यांचे हे विधान मराठा समाजाची बदनामी करणारे व त्यांचा अपमान करणारे आहे. मराठा समाजाचा अपमान करणाऱ्या तानाजी सावंत यांचा कळंब शहरात गाढवाच्या गळ्यात फोटोचा फलक बांधून सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यानी निषेध व्यक्त केला. यावेळी ही गाढवे प्रशासकीय ईमारत परिसरात सोडुन सावंत यांचा जाहीर निषेध नोंदवला.

वादग्रस्त आरोग्यमंत्री तानाजी सावंतानी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा हाच खाज असलेला मराठा समाज तुम्हाला तुमची जागा दाखवेल. मराठा आरक्षणाची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातून विविध संघटना, राजकीय पक्ष यांचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारी पातळीवर व न्यायालयीन पातळीवरही हा लढा सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. 2014 साली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने मराठी समाजाला आरक्षण दिले होते परंतु त्यानंतर आलेल्या फडणवीस सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा आरक्षण संपुष्टात आले. आजही हा प्रश्न सुटावा व मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असताना राज्यातील शिंदे मंत्री अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करतात हे अत्यंत निषेधार्ह आहे.

तानाजी सावंत यांचे विधान सत्तेचा माज दाखवते पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, सत्तेची मस्ती कशी उतरवायची हे त्यांना चांगले माहित आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागावी व शिंदे-फडणवीस यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशीही मागणी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यIनी केली.