मिंधे सरकारच्या अब्रूचे धिंडवडे, आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच रुग्णांची उपासमार; रुग्णांचा अन्नपुरवठा बंद

मिंधे सरकारमधील खोकेबाज आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांत उपचार घेणार्‍या रुग्णांचा नाश्ता व जेवण 21 दिवसांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आहार पुरवठ्याचे बिल थकल्याने कंत्राटदाराने अन्नपुरवठा बंद केल्याने रुग्णांसह नातेवाईकांचे हाल होत आहेत. या गंभीर प्रकाराने आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच थापाड्या सरकारच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहे.

जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका ग्रामीण रुग्णालयात आरोग्य विभागाकडून भरती झालेल्या रुग्णांना दोन वेळचे जेवण आणि नाष्टा दिला जातो. मात्र बिल थकल्याने त्रस्त झालेल्या कंत्राटदाराने ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना 17 ऑगस्टपासून जेवण देणे बंद केले आहे. लोहारा ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज 300 ते 400 रुग्णांची नोंद होते. तर आंतररुग्ण विभागात 20 ते 25 रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. त्यानुसार उपचाराकरिता दाखल झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. 4 सप्टेंबर रोजी रात्री कर्तव्य बजावणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांना दाखल रुग्णांना आहार मिळत नाही याचा मागमुसही नव्हता.

लाखो रुपयांचे बिल थकले

फसव्या घोषणांचा पाऊस पाडणार्‍या मिंधे सरकारकडे कंत्राटदाराचे लाखो रुपयांचे बिल थकले आहे. लातूरच्या कंत्राटदाराला जिल्ह्यात सर्व जिल्हा व तालुका ग्रामीण रुग्णालयांत अन्नपुरवठा करण्याचे कंत्राट आरोग्य विभागाकडून देण्यात आले. त्याने प्रत्येक तालुक्यात व्यवहारिक दृष्टिकोनातून मर्जीतील हॉटेल चालकांना तालुका ग्रामीण रुग्णालयात अन्नपुरवठा करण्याची जबाबदारी दिली. लोहारा ग्रामीण रुग्णालयात अन्नपुरवठ्याची जबाबदारी जीवन गोरे यांच्या हॉटेल संदेशला दिली आहे. जवळपास चार ते पाच लाख रुपये बिल मुख्य कंत्राट दाराकडे थकीत असल्याने गोरे यांनी ग्रामीण रुग्णालयातील अन्नपुरवठा बंद केल्याचे उघड झाले आहे.

रुग्णांची उपासमार

जवळपास 21 दिवसांपासून नाश्ता व दोन जेवण मिळत नसल्याने रुग्णांना आजारासोबत उपासमारीचा सामना करावा लागत आहे. तसेच ग्रामीण भागातून त्यांच्या नातेवाईकांना येण्यास वाहन उपलब्ध नसल्याने निर्धारित वेळेत रुग्णांना जेवण आणता येत नाही. राज्यातील फसवे सरकार व कंत्राटदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे उपचार घेत असलेल्या लाडक्या बहिणींना उपासमारीचा सामना करावा लागत आहे.

मी तीन दिवसापासून ताप कमी होत नसल्याने या ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल आहे. तीन दिवसापासून मला आरोग्य विभागाच्या वतीने दिला जाणारा नाश्ता व दोन वेळचे जेवण मिळाले नाही. – वैष्णवी राम सुतार, रुग्ण, लोहारा.

मला डेंग्यू संसर्ग झाल्याने मी रुग्णालयात दाखल आहे. परंतु मला संध्याकाळचे सकाळचे जेवण मिळाले नाही. – आदित्य रमेश जाधव, लोहारा.

मी दोन दिवसांपूर्वी प्रभारी अधीक्षक ग्रामीण रुग्णालय लोहारा पदाचा पदभार स्वीकारला आहे. रुग्णालयातील रुग्णांना जेवण बंद असल्याचे मला माहित नाही. मी या प्रकरणी माहिती घेऊन कंत्राटदाराला बोलून लवकरात लवकर अन्नपुरवठा चालू करण्याकरिता प्रयत्न करतो. – डॉ. गोविंद साठे, प्रभारी अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, लोहारा.

नांदेड येथील विलास मुळे यांच्याकडे तीन जिल्ह्याचे अन्नपुरवठ्याचे कंत्राट आहे. त्यांच्यामार्फत लोहारा तालुका ग्रामीण रुग्णालयात अन्नपुरवठा करण्याची जबाबदारी आम्हाला देण्यात आली आहे. परंतु आमच्या हॉटेल संदेशचे १ लाख २० हजार रुपये मुख्य अन्नपुरवठा कंत्राटदार यांच्याकडे थकीत आहेत. आम्हाला बिल मिळत नसल्यामुळे आम्ही अन्नपुरवठा बंद केला आहे. – विशाल गोरे, हॉटेल संदेश, लोहारा.

सरकारकडे अन्नपुरवठ्याचे आमचे जवळपास कोट्यावधी रुपये येणे आहेत. यामुळे आम्हाला ग्रामीण रुग्णालयात अन्नपुरवठा करण्याकरिता आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. – विलास मुळे, धाराशिव जिल्हा अन्नपुरवठा कंत्राटदार, नांदेड आरोग्य विभाग.

धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुका ग्रामीण रुग्णालयात अन्नपुरवठा बंद असलेली माहिती आजच तुमच्या माध्यमातून मिळाली. कंत्राटदाराला एक ऑगस्ट महिन्याची मुदत वाढवून दिली होती. त्यांनी अन्नपुरवठा सुरळीत करण्याचा हमीपत्र दिलेले आहे. संबंधिताच्या बिलाचा पाठपुरावा संचालक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे सुरू आहे. आपण कंत्राटदाराना नोटीस काढून अन्नपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न करू.  – डॉ. नागनाथ धर्माधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, धाराशिव.