मिंध्यांना अजित पवार गटाची अ‍ॅलर्जी; आरोग्यमंत्री म्हणतात, मांडीला मांडी लावून बसलो की उलट्या होतात!

महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेल्या मिंधे-भाजप सरकारमध्ये गतवर्षी अजित पवार यांची एन्ट्री झाली. सत्तेमध्ये नवा वाटेकरी आल्याने मिंध्यांसोबत गेलेल्या गद्दार आमदारांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असले तरी मिंधे गट आणि अजित पवार गटातील धुसमूस सुरुच आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी मिंधे गटाने अजित पवार गटाला सहकार्य केले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून तत्पूर्वी मिंधे आणि अजित पवार गटातील वाकयुद्ध पुन्हा रंगू लागले आहे.

मिंधे गटाचे आमदार आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात अजित पवार गटावर टीका केली. यामुळे महायुतीमधील तणाव आणखी वाढला आहे. ‘अजित पवार गटाशी आपले आयुष्यभर पटले नाही, मात्र आता त्यांच्यासोबतच सत्तेत मांडीला मांडी लावून बसलो आहे. पण बाहेर आलो की मला उलट्या होतात’, असे विधान सावंत यांनी एका कार्यक्रमात केले. या विधानाचा अजित पवार गटानेही खरपूस समाचार घेतला आहे.

अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी मिंधे आमदार तानाजी सावंत यांच्यावर पलटवार केला. तसेच अजित पवार यांना थेट सत्तेतून बाहेर पडण्याचाही सल्ला दिला. ‘तानाजी सावंत यांचे ऐकून घेण्यापेक्षा महायुतीमधून बाहेर पडू. आम्हाला सत्तेची गरज नाही. भाजपने शिंदेंना मुख्यमंत्री केले आणि त्याच भाजप नेत्यांना अजित पवार महायुतीत घेतले. मोदी, शहा आणि भाजपने हा निर्णय घेतला. याच महायुतीमुळे सावंत मंत्री असून आम्हाला कुणी बोलणार असेल तर आम्ही सत्तेत राहणार नाही’, असा इशारा पाटील यांनी दिला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल नसून जशीजशी निवडणूक जवळ येईल तसेतसे आणखी फटाके फुटण्याचीच शक्यता आहे.

मिटकरींचा टोला

तानाजी सावंत यांच्या विधानावर अजित पवार गटाचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनीही परखड भाष्य केले आहे. ‘सावंत राज्याचे आरोग्यमंत्री असून त्यांना नेमक्या उलट्या कोणत्या कारणामुळे होत असाव्यात याबाबत माहिती नाही. कदाचित त्याचा आरोग्याशीही संबंध असू शकतो. महायुतीत असल्याने उलट्या होत असतील तर शिंदेनी त्यांचा इलाज करावा’, असा खोचक टोला मिटकरी यांनी लगावला.