महाराष्ट्राची तनिषा ज्युनियर टेबल टेनिसमध्ये राष्ट्रीय विजेती

महाराष्ट्राच्या तनिषा कोटेचाने 83 व्या  जुनियर आणि युथ राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत अंडर-17 गटात विजेतेपद पटकावत राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे. तनिषाने अल्लपुझा, केरळ येथे पार पडलेल्या या स्पर्धेत कोलकाताच्या सुभांकरिता दत्ता हिला 4-0 असे सहज पराभूत करीत आपले कारकीर्दीतील पहिले राष्ट्रीय ज्युनियर विजेतेपद पटकावले. तर अंडर-19 गटात तामीळनाडूच्या नित्यश्री मणीने महाराष्ट्राच्या रिशा मिरचंदानीचे आव्हान 4-1 असे संपुष्टात आणत जेतेपदावर आपले नाव कोरले.

  नाशिककर तनिषाने या स्पर्धेत अफलातून कामगिरी करीत अंतिम फेरी गाठली. तिने आपले पहिलेवहिले ज्युनियर जेतेपद पटकावताना शानदार खेळ केला. अंतिम फेरीत तिने कोलकाताच्या नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्सचे प्रतिनिधित्व करणाऱया दत्तावर 11-6 , 11-6 , 11-5 , 11-4 असा सरळ चार सेटमध्ये विजय मिळवला पहिल्या आणि दुसऱया सेटमध्ये दत्ताने काहीसा प्रतिकार करीत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण नंतरच्या दोन सेटमध्ये तनिषाने तिला फारसा प्रतिकार करण्याची संधीच दिली नाही.