स्वप्नात बलात्कार केला, महिलेचा मांत्रिकावर आरोप

बिहारमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका मांत्रिकाने स्वप्नात येऊन आपल्यावर वारंवार बलात्कार केला अशी तक्रार एका महिलेने केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना बिहारच्या औरंगाबादमधील आहे. एका महिलेच्या मुलाची तब्येत बिघडली होती. तेव्हा आपल्या मुलाची तब्येत ठीक व्हावी म्हणून ही महिला मांत्रिक प्रशांत चतुर्वेदी याच्याकडे गेली. चतुर्वेदी यांनी मुलाची तब्येत ठीक होण्यासाठी पूजा करण्यास सांगितली. परंतु पूजा केल्यानंतर 15 दिवसांत मुलाचा मृत्यू झाला.

आपल्या मुलाचा मृत्यू कसा झाला याचा जाब विचारण्यासाठी महिला मांत्रिकाच्या घरी गेली. तेव्हा मांत्रिकाने आपल्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या मुलाने आपल्याला वाचवले असा दावा या महिलेने केला. तसेच मांत्रिकाने स्वप्नात येऊन आपल्यावर वारंवार बलात्कार केला असा आरोपही या महिलेने केला.

महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच मांत्रिकाला बोलावून चौकशी केली. तेव्हा या महिलेला आपण कधी भेटलोच नाही असे स्पष्टीकरण मांत्रिकाने दिले. मांत्रिक चतुर्वेदी याच्याविरोधात कुठलाच पुरावा नसल्याने पोलिसांनी त्याला सोडून दिले.

आपली प्रतिक्रिया द्या