तापसी पन्नूने केले नेपो किड्सचे कौतुक; म्हणाली “ही” गोष्ट शिकण्यासारखी…

अभिनेत्री तापसी पन्नू हिने कोणत्याही गॉडफादरशिवाय बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. सिनेसृष्टीतील काही आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये अनेकदा तापसीचे नाव घेतले जाते. बॉलिवूडमध्ये आऊटसायडर असल्याचा तापसीला खूप अभिमान देखील आहे. तिने स्वत: च्या प्रोडक्शन हाऊसलासुद्धा “आउटसायडर फिल्म्स” असे नाव दिले आहे. बॉलिवूडमधील नेपोटिझमच्या चर्चेतदेखील ती अनेकदा सहभागी झाली आहे. आता तापसीने इंडस्ट्रीतील आतल्या बाहेरच्या लोकांमधील वादावरून वक्तव्य केले आहे.

तापसीने नुकतेच एएनआयला दिलेल्या मुलाखतीत, नेपो-किड्सकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, जी बाहेरून आलेल्या स्टार्सकडे नाही, असे म्हटले आहे. “माझे मत इतरांपेक्षा वेगळे आहे. इंडस्ट्रीमध्ये आधीपासून असलेल्या लोकांकडून एक गोष्ट शिकण्याजोगी आहे, आणि ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीत एकमेकांची साथ न सोडणे, व एकजुटीने राहणे. ही गोष्ट इंडस्ट्रीमध्ये बाहेरून आलेल्यांकडे पाहावयास मिळत नाही.

तापसीच्या मते, बॉलीवूडमध्ये बाहेरून येणाऱ्या कलाकारांना संघर्ष करण्याची आणि एकमेकांना मागे टाकण्याची सवय झाली आहे. नेपो किड्स चित्रपट पाहिल्यानंतर ते एकमेकांचा आदर करतात, मात्र ही गोष्ट आउटसायडर्सकडे दिसून येत नाही. चागंला चित्रपट असो किंवा वाईट, एखाद्या व्यक्तीच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची भावना नेपो किड्समध्ये असते, आणि हिच गोष्ट खूप चांगली आहे. त्यांच्याकडून ही गोष्ट शिकण्यासारखी असल्याचे तापसीने म्हटले आहे.